`रोहितनंतर तो उत्तम पर्याय ठरु शकतो`; जाफरच्या मते `हा` खेळाडू टीम इंडियाचा `भावी कर्णधार`
Good Captaincy Option After Rohit Sharma: भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने भारतीय संघातील या खेळाडूच्या कामगिरीच सविस्तरपणे विश्लेषण करताना नेमकी त्याची चूक कुठे होतेय याबद्दलही भाष्य केलं आहे.
Good Captaincy Option After Rohit Sharma: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या मालिकेच्या माध्यमातून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या 2023-25 पर्वाचा शुभारंभ केला आहे. भारताने पाहिल्या कसोटीमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला 171 धावा आणि एका डावाने पराभूत करत दमदार सुरुवात केली. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. भारतासाठी सध्या यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि रोहित शर्माने या मालिकेमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मात्र अजिंक्य रहाणेला या मालिकेमध्ये आतापर्यंत म्हणावं तसं यश आलं नाही. डोमिनिकामध्ये त्याने 3 धावा केल्या तर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्याला 8 धावाच करता आल्या.
जाफरने केलं समर्थन
अजिंक्य रहाणेला इंडियन प्रमिअर लिगमधील कामगिरी आणि घरगुती स्पर्धांमधील कामगिरीच्या जोरावर भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आली. मात्र या निर्णयावरुन बीसीसीआयच्या निवड समितीवर टीकाही करण्यात आली. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 च्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणे एकटाच मैदानावर तळ ठोकून होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात 89 तर दुसऱ्या डावात 46 धावा केल्या. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध अजिंक्यला चमकदार कामगिरी करता आली नाही. टीकाकारांनी रहाणेविरुद्ध टीकेची झोड उठवली आहे. मात्र भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने रहाणेचं समर्थन केलं आहे. रहाणाने त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्याची गरज आहे असं जाफरने म्हटलं आहे. रोहित शर्मानंतर कर्णधार म्हणून रहाणेचा अजूनही विचार करता येईल असंही जाफरने म्हटलं आहे.
तो कुठे चुकतोय?
जाफरने 'जिओ सिनेमा'वर रहाणेसंदर्भात बोलताना ही विधानं केली. रहाणेनं सातत्य कायम ठेवणं गरजेचं आहे. रहाणे जवळवजळ 80 ते 90 कसोटी सामने खेळलेला असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्याचा आभाव आहे. रहाणेनं आता या समस्येवर मात मिळवणं फारच आवश्यक आहे. कारण रहाणेच्या रुपानं भारताकडे असा एक खेळाडू उपलब्ध आहे जो रोहित शर्मानंतर कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. रहाणेला सातत्यपूर्णपणे धावा करायला हव्यात. बाकी गोष्टी त्यानंतर आपोआप होतील, असं जाफरने म्हटलं आहे.
...तर तो कर्णधार झाला असता
2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 च्या फरकाने जिंकल्यानंतर रहाणे कसोटी संघाचा कर्णधार झाला असता, असंही जाफरने म्हटलं आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने चांगली कामगिरी केली. मात्र रहाणेची वैयक्तिक कामगिरी सातत्यपूर्ण नसल्याचा फटका त्याला बसला. त्याने सातत्यपूर्ण खेळी केली असती तर तो भारतीय कसोटी संघाचा पुढील कर्णधार झाला असता. मात्र त्याची कामगिरी खालावत गेली आणि तो संघातूनच बाहेर फेकला गेला, असंही जाफर म्हणाला.