मुंबई : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी करण्यात आली. या दौऱ्यातल्या टी-२० सीरिजसाठी दीपक चहर आणि राहुल चहर या दोन भावांची निवड करण्यात आली. घरातल्या दोन्ही मुलांची टीममध्ये निवड झाल्यामुळे राजस्थानच्या चहर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. राहुल आणि दीपक हे दोघं चुलत आणि मावस भाऊ आहेत. दीपकचे वडिल लोकेंद्र चहर दोघांना प्रशिक्षण देतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दोन्ही मुलांची टीममध्ये निवड होणं खास आहे. प्रत्येक मुलगा जेव्हा बॅट आणि बॉल उचलतो, तेव्हा त्याला देशासाठी खेळावं असंच वाटत असतं. आमच्या घरातली एक नाही तर दोन मुलं देशासाठी खेळणार आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असेल?. राहुलला जसं कळलं तसं त्याने मला बोलावलं. टीम निवड होण्याच्या एक रात्र आधी मी झोपलो नव्हतो. टीम निवडीची वाट पाहत होतो,' असं राहुलचे वडिल देश राज म्हणाले.


'आयपीएलसाठी राहुल चहरने इतर टीमसाठीही ट्रायल दिल्या होत्या. पण त्याला बाहेर करण्यात आलं. मुंबई इंडियन्सची ट्रायल तेव्हा सुरु होती. राहुलसाठी ही महत्त्वाची संधी होती. या संधीचं त्याने सोनं केलं आणि मुंबई इंडियन्सनी त्याला संधी दिली,' अशी प्रतिक्रिया देश राज यांनी दिली. राहुल चहरला मुंबई इंडियन्सने १.९० कोटी रुपयांना विकत घेतलं. या मोसमात राहुलने १३ मॅचमध्ये १३ विकेट घेतल्या.


राहुलचा भाऊ दीपक चहर आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळतो. मध्यमगती बॉलर असलेल्या दीपक चहरला चेन्नईने ९० लाख रुपयांना विकत घेतलं. दीपक चहरने आधीच भारताकडून वनडे आणि टी-२० मॅच खेळल्या आहेत. 


'धोनीने २०१७ सालच्या आयपीएलमध्ये पुण्याकडून खेळताना दीपकची मदत केली,' असं देश राज यांनी सांगितलं.