मुंबई : बांगलादेशविरुद्धची टेस्ट सीरिज २-०ने जिंकल्यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. यासाठी टीमची निवडही करण्यात आली आहे. संजू सॅमसनला या टीममधून बाहेर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हरभजन सिंग चांगलाच नाराज झाला आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने निवड समितीमध्ये बदल करावा आणि मजबूत लोकांना आणावं, अशी मागणी हरभजन सिंगने केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीने काहीच दिवसापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये संजू सॅमसनची निवड करण्यात आली होती, पण एकाही मॅचमध्ये सॅमसनला संधी मिळाली नाही. एकही संधी न देता संजू सॅमसनला विडिंजविरुद्ध डच्चू देण्यात आल्यामुळे निवड समितीवर टीका होत आहे.


तिरुवनंतपूरमचे काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी सॅमसनला संधी न देता हटवल्यामुळे आपण नाराज झाल्याचं ट्विट केलं होतं. बांगलादेशविरुद्धच्या ३ टी-२० मॅचमध्ये सॅमसन खेळाडूंना पाणी देत होता. त्याची बॅटिंग बघायची होती का त्याचं मन? असा सवाल थरुर यांनी उपस्थित केला.


शशी थरुर यांच्या या ट्विटला हरभजन सिंगने उत्तर दिलं आहे. मला वाटतं ते सॅमसनचं मन बघत होते. निवड समितीमध्ये बदल झाले पाहिजेत. तिकडे मजबूत लोकांची गरज आहे. दादा असं करेल याची अपेक्षा आहे, असं हरभजन म्हणाला.



भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. टी-२० सीरिजनंतर ३ वनडे मॅचची सीरिजही खेळवण्यात येणार आहे. निवड समितीने २१ नोव्हेंबरला टीम इंडियाची घोषणा केली होती.


वनडे टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार


टी-२० टीम 


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार