आणि कोहलीच्या पुढे गेला हार्दिक पांड्या
श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनं जिंकली आहे.
कॅन्डी : श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनं जिंकली आहे. याचबरोबर ही सीरिजही भारतानं ३-०नं जिंकली. ९६ बॉल्समध्ये १०८ रन्सची अफलातून खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
हार्दिक पांड्याच्या या खेळीमध्ये ७ सिक्सचा समावेश होता. या ७ सिक्समुळे हार्दिक पांड्या यंदाच्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६ सिक्स मारल्या आहेत. या वर्षी सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत हार्दिक आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
यावर्षी सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या भारतीयांच्या यादीमध्ये कोहली १९ सिक्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जडेजानं १४, धोनीनं १३ आणि युवराजनं १० सिक्स मारले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या वादळी सेंच्युरीमुळे पांड्यानं अनेक रेकॉर्ड्सना गवसणी घातली आहे. लंचच्याआधी सेंच्युरी करणारा पांड्या पहिला भारतीय ठरला.
सर्वात जलद सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीत हार्दिक पांड्या आता पाचव्या क्रमांकावर आहे. कपील देव आणि मोहम्मद अझरुद्दीननं ७४ बॉल्समध्ये सेंच्युरी केली होती. तर सेहवागनं ७८ आणि शिखर धवननं ८५ बॉल्समध्ये सेंच्युरी करण्याचा विक्रम केला होता. हार्दिक आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये सर्वात जास्त तीन सिक्स मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.