मुंबई : भारतीय क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सीरिज सुरु असतानाच भारतीय टीमसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या फिट होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. हार्दिक पांड्या फक्त मैदानातच उतरला नाही तर त्यानं मुंबईविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये ५ विकेटही घेतल्या. या कामगिरीमुळे हार्दिक पांड्याची भारतीय टीममधल्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीम ज्यादिवशी (१४ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट मॅच खेळायला मैदानात उतरली, त्याचदिवशी २ तासानंतर हार्दिक पांड्या मुंबईच्या मैदानात उतरला. आशिया कपदरम्यान १९ सप्टेंबरला युएईमध्ये खेळवण्यात आलेल्या मॅचदरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे पांड्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचला मुकला होता. हार्दिक पांड्या फिट झाल्यानंतर त्याला बीसीसीआयनं रणजी ट्रॉफी खेळून स्वत:चा फिटनेस सिद्ध करायला सांगितला.


बीसीसीआयच्या आदेशानंतर हार्दिक पांड्या मुंबईविरुद्धच्या रणजी ट्रॉफी मॅचमध्ये बडोद्याकडून खेळायला उतरला. बडोद्याचा कर्णधार केदार देवधरनं हार्दिक पांड्याला पहिलीच ओव्हर दिली. पांड्यानंही कर्णधाराला निराश केलं नाही. मुंबईची इनिंग ४६५ रनवर संपली तेव्हा हार्दिक पांड्यानं ५ विकेट घेतल्या होत्या. पांड्यानं बडोद्यासाठी सर्वाधिक १८.५ ओव्हर टाकल्या.


पांड्याच्या अनुपस्थितीमुळे भारताची अडचण


ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला फास्ट बॉलिंग करु शकणाऱ्या ऑलराऊंडरची कमी जाणवत आहे. पर्थच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत ४ फास्ट बॉलर १ विकेट कीपर आणि ६ बॅट्समन घेऊन मैदानात उतरला आहे. पण जर हार्दिक पांड्यासारखा खेळाडू टीममध्ये असता तर भारत ३ फास्ट बॉलर, एक ऑलराऊंडर आणि २ स्पिनर घेऊन मैदनात उतरू शकला असता. यामुळे भारतीय टीममध्ये संतुलन आलं असतं, याचबरोबर बॉलिंगमध्ये वेगळेपणही दिसलं असतं.


स्पिन ऑलराऊंडर कामाचा नाही 


भारतीय टीममध्ये सध्या रवींद्र जडेजाच्या रुपात स्पिन ऑलराऊंडर आहे. पण ऑस्ट्रेलियातल्या फास्ट बॉलरना अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर रवींद्र जडेजाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यामुळे हार्दिक पांड्याची कमी भारतीय टीमला नक्कीच जाणवत असेल. जर मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पांड्यानं बॅटिंग करतानाही चांगलं प्रदर्शन केलं तर त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवलं जाऊ शकतं. भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजची तिसरी टेस्ट २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.