हार्दिक पांड्यामुळे टी 20 वर्ल्ड कप खेळण्याचं या खेळाडूचं स्वप्न अधूरं?
टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी हुकणार, हार्दिक पांड्या या खेळाडूच्या स्वप्नांना लावणार सुरुंग?
मुंबई : रोहित शर्माच्या हाती कर्णधारपदाची धुरा आल्यानंतर टीम इंडियाची कामगिरी दिवसेंदिवस अधिक उत्तम होत आहे. टीम इंडियाच्या विजयाचा दबदबा वाढत आहे. खेळाडूही उत्तम कामगिरी करत आहेत. मात्र आता टीम इंडियाच्या एका खेळाडूची जागा धोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उत्तम कामगिरी करूनही या खेळाडूचं करिअर धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हार्दिक पांड्याने नुकतीच फिटनेस टेस्ट उत्तम प्रकारे पास केली आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. याशिवाय पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे तो गोलंदाजी देखील करत नव्हता. त्यामुळे त्याला ऑलराऊंडर का म्हणावं असा प्रश्नही अनेक दिग्गजांनी उपस्थित केला होता.
टी 20 वर्ल्ड कप दरम्यान व्यंकटेश अय्यरला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने आपला उत्तम फॉर्म कायम ठेवला. मात्र तरीही आता त्याची जागा धोक्यात आली आहे. याचं कारण म्हणजे हार्दिक पांड्या आहे. हार्दिक पांड्या फिटनेस टेस्ट पास झाल्याने तो टीम इंडियामध्ये पुन्हा खेळण्याची शक्यता आहे. व्यंकटेश अय्यरला हार्दिकच्या जागी घेण्यात आलं होतं.
टी 20 वर्ल्ड कपपासून हार्दिक पांड्या टीम इंडियातून बाहेर आहे. याचा फायदा व्यंकटेश अय्यरला झाला. पांड्या गेल्यानं त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मनंही जिंकली. मात्र गोलंदाजीमध्ये त्याला विशेष यश मिळालं नाही.
हार्दिक पांड्या नॅशनल क्रिकेट अकादमीत झालेल्या यो-यो टेस्टमध्ये उत्तीर्ण झाला असून तो आयपीएल खेळण्यासाठीही सज्ज झाला आहे. हार्दिक हा नेहमीच टीम इंडियाची पहिली पसंती राहिला आहे. अशा परिस्थितीत अय्यरला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी दावेदार म्हणून स्वत: ला सिद्ध करण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे.
व्यंकटेश आयपीएलच्या 15 व्या हंगामात कोलकाता संघाकडून खेळताना दिसणार आहे. मेगा ऑक्शन 2022 पूर्वी KKR ने ऑलराऊंडर अय्यरला 8 कोटी रुपये देऊन आपल्या संघात कायम ठेवलं. तर हार्दिक पांड्या गुजरात संघाकडून खेळणार आहे. गुजरात संघाच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिककडे असणार आहे.
आयपीएल 2021 च्या हंगामात अय्यरने 10 सामन्यांमध्ये 41.11 च्या सरासरीने आणि 128.47 च्या स्ट्राइक रेटने 370 धावा केल्या. यासोबत त्याने 3 अर्धशतकं ठोकली आणि 3 विकेट्स घेतल्या.