वर्ल्डकप स्पर्धा सुरु असतानाच भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यात जखमी झालेला हार्दिक पांड्या लीगमधील अखेरच्या किंवा सेमी-फायनल सामन्यात पुनरागमन करेल अशी आशा होती. पण आता हार्दिक पांड्या वर्ल्डकपमध्ये खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात जागा देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. मी आता वर्ल्डकप स्पर्धेचा भाग नाही ही गोष्ट पचवणं फार जड आहे असं हार्दिकने म्हटलं आहे. तसंच हा संघ विशेष असून सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 


World Cup 2023: 'हार्दिक पांड्या संघात परतला तरी...', रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं


हार्दिकने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी आता उर्वरित वर्ल्डकपचा भाग नसेन ही गोष्ट पचवणं थोडं जड आहे. पण मी प्रत्येक चेंडूवर संघासाठी चिअऱ करत असेन. तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार. हा संघ विशेष असून सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल".



भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपमध्ये अजय राहिला आहे. भारताने सर्वच्या सर्व 7 सामने जिंकत सेमी-फायनल गाठली आहे. भारतीय संघाला 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि नंतर 12 नोव्हेंबरला नेदरलँडविरोधात सामना खेळायचा आहे. त्यानंतर सेमी-फायनल सामना होणार आहे. 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. 


पांड्या नेमका जखमी कसा झाला?


19 ऑक्टोबर रोजी पुण्यात झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये हार्दिक पांड्या जखमी झाला होता. बांगलादेशविरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. तो साखळी फेरीमधील सामने खेळणार नाही असं आधी सांगण्यात आलं होतं. मात्र आज तो संपूर्ण स्पर्धेमधूनच बाहेर पडला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 


भारताने पंड्याशिवाय खेळण्याची तयारी ठेवली


तशी भारताने हार्दिक पांड्याशिवाय खेळण्याची मानसिक तयारी ठेवली होती. 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे मैदानात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधीच भारताचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भातील संकेत दिले होते. "हार्दिक पंड्या संघात असला किंवा नसला तरी आम्ही सर्व पर्याय खुले ठेवत आहोत. उद्या जर परिस्थितीची मागणी असेल तर आम्ही तीन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. ते मधील ओव्हर्समध्ये धावांची गती रोखू शकतात. आमच्या फिरकी गोलंदाजांकडे अशा स्थितीत खेळण्याचं कौशल्य आहे," असं रोहित शर्माने सांगितलं होतं.