World Cup 2023: 'हार्दिक पांड्या संघात परतला तरी...', रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी असल्याने संघाबाहेर आहे. यादरम्यान रोहित शर्माने त्याच्या दुखापतीवर भाष्य करत संघाची नेमकी काय योजना असेल हे सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 2, 2023, 12:41 PM IST
World Cup 2023: 'हार्दिक पांड्या संघात परतला तरी...', रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं title=

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने जर गरज भासली तर वर्ल्डकपमध्ये आम्ही तीन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो असं सांगितलं आहे. भारतीय संघ आज श्रीलंकेशी भिडणार असून, मुंबईतील वानखेडे मैदानात हा सामना होणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावळी त्याने हार्दिक पांड्याच्या दुखापतीवरही भाष्य केलं. बांगलादेशविरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्यावर उपचार सुरु असून, सध्या संघाबाहेर आहे. दरम्यान हार्दिक पांड्या संघात नसल्याने संघाचा समतोल राखणं अवघड जात असल्याची चर्चा आहे. पण रोहित शर्माने उद्या हार्दिक पांड्या उर्वरित सामन्यांसाठी फिट झाला तरी संघ इतर प्रयोग करुन पाहिल असं सांगितलं आहे. 

"आम्ही सर्व प्रकारचे प्रयोग करुन पाहू शकतो. आम्ही तीन फिरकी आणि दोन जलदगती गोलंदाजांसहदेखील खेळू शकतो. या स्पर्धेत फिरकी गोलंदाज मधील ओव्हर्समध्ये खऱ्या अर्थाने धावा रोखत आहेत. हार्दिक पांड्या संघात असला किंवा नसला तरी आम्ही सर्व पर्याय खुले ठेवत आहोत. उद्या जर परिस्थितीची मागणी असेल तर आम्ही तीन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. ते मधील ओव्हर्समध्ये धावांची गती रोखू शकतात. आमच्या फिरकी गोलंदाजांकडे अशा स्थितीत खेळण्याचं कौशल्य आहे," असं रोहित शर्माने सांगितलं आहे.

तू रेकॉर्डचा विचार करत नाहीस का? प्रश्न ऐकताच रोहित म्हणाला 'मी इतका स्वार्थी....'

 

गोलंदाजांवर आणि खासकरुन फिरकी गोलंदाजांवर किती भार आहे यासंबंधी बोलताना रोहितने ते फार चांगल्या स्थितीत असल्याचं सांगितलं. "गोलंदाजांना विश्रांती देण्याचा प्रश्न असेल तर ते सध्या चांगल्या लयीत आहेत. त्यांना आरामाची गरज नाही. त्यांचं शरीर थकलेलं नाही. सामने खेळत असल्याचा मला आनंद आहे," असं रोहित शर्माने म्हटलं.

हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर बोलताना सांगितलं की, "दुखापतीनंतर सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. श्रीलंकेविरोधात सामन्यात तो खेळणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करत आहोत. तो लवकरात लवकर खेळू शकतो". 

मुंबईतील प्रदूषणावर बोलताना रोहित शर्माने मी नेहमीच आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करत असतो असं सांगितलं. तसंच संबंधित विभाग याची काळजी घेत असेल अशी आशाही व्यक्त केली. रोहित शर्माने मुंबईत येताना विमानातील एक फोटो शेअर करत प्रदूषणावर चिंता व्यक्त केली होती. 

हार्दिक पांड्या थेट सेमी-फायनलमध्ये खेळणार?

हार्दिक पांड्या अद्यापही जखमी असल्याने श्रीलंका आणि 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या सामन्यातही तो खेळणार नाही. 12 नोव्हेंबरला भारतीय संघ लीममधील शेवटचा सामना नेदरलँडविरोधात खेळणार आहे. हार्दिक पांड्या या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. बंगळुरुत हा सामना होणार आहे.  

"ही किरकोळ जखम आहे. तो दुखापतीमधून सावरत असून, लीगच्या अखेरच्या सामन्यात पुनरागन करु शकतो. किंवा तो बहुतेक थेट सेमी-फायनल सामनाही खेळू शकतो," अशी बीसीसीआय सूत्रांची माहिती आहे.

तू रेकॉर्डचा विचार करत नाहीस का?

"वर्ल्डकपमध्ये तू निस्वार्थ भावनेने फलंदाजी करत आहे, त्याचं कौतुक होत आहे. तू कोणताही रेकॉर्ड करण्यापेक्षा चांगली खेळी करण्याकडे लक्ष देत आहेस. पॉवरप्लेमध्ये तू सर्वाधिक धावा केल्या आहेस. काही माजी खेळाडूंना संघासाठी स्वार्थी झालात तर बरं होईल असा सल्लाही दिला आहे," असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. त्यावर रोहित म्हणाला की, "मी सुरुवातीला फलंदाजीला जात असल्याने विचार करुन खेळावं लागतं. याचं कारण माझ्या खेळीने संपूर्ण चित्र तयार होत असतं. त्यामुळे माझ्याकडे चांगली संधी किंवा फायदा असतो असं तुम्ही म्हणू शकता. कारण माझ्यावर विकेट गेल्याचा काही दबाव नसतो. त्यामुळे जेव्हा 0-0 अशी स्थिती असते तेव्हा तुम्ही न घाबरता आणि जसं हवं तसं खेळू शकता," असं रोहित शर्माने सांगितलं. 

"जर तीन विकेट गमावल्या असतील तर एक फलंदाज म्हणून तुम्हाला संघासाठी जे योग्य आहे ते करावं लागतं. पहिल्या ओव्हरमध्ये काय गरज आहे, पाचव्यात काय आणि दहाव्या ओव्हरमध्ये काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. संघाची धावसंख्या किती आहे, किती धावांचा पाठलाग करत आहोत, या मैदानावर किती धावसंख्या उभारणं गरजेचं आहे? या सगळ्याचा विचार केला जातो. त्यामुळे त्यावेळी जशी गरज असते त्यानुसार मी खेळत असतो," असं रोहित शर्मा म्हणाला/