मुंबई : न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीमने टी-२० सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ५ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये भारताने ४-०ने आघाडी घेतली आहे. टी-२० सीरिज संपल्यानंतर भारत ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या टेस्ट सीरिजमध्येही ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं पुनरागमन होणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या ६ महिन्यांपासून हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे टीमबाहेर आहे. शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पांड्या अजूनही दुखापतीतून पूर्ण फिट झालेला नाही, त्यामुळे त्याची टेस्ट सीरिजसाठी निवड होणार नाही. हार्दिक हा एनसीएचे प्रमुख फिजिओ आशिष कौशिक यांच्यासोबत लंडनला रवाना झाला आहे. लंडनमध्ये स्पायनल सर्जन डॉक्टर जेम्स आलीबोन हार्दिकच्या दुखापतीची पाहणी करतील.


हार्दिक पांड्या जोपर्यंत पूर्ण फिट होत नाही, तोपर्यंत तो एनसीएमध्ये रिहॅब करेल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचआधी मुंबईमध्ये हार्दिकने भारतीय टीमसोबत सरावही केला होता. यानंतर भारतीय टीम प्रशासनाने हार्दिकला एनसीएमध्ये पाठवलं.


हार्दिक पांड्याची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारत-ए टीममध्ये निवड झाली होती, पण पूर्णपणे फिट न झाल्यामुळे हार्दिकने या दौऱ्यातून माघार घेतली. हार्दिकऐवजी विजय शंकरची भारत-ए टीममध्ये निवड झाली. 


दुखापतीतून सावरण्यासाठी ४ महिने लागले, तरी न्यूझीलंड दौऱ्याच्या मध्यात मी टीममध्ये पुनरागमन करीन, असं वाटत होतं. काही आंतरराष्ट्रीय सामने, त्यानंतर आयपीएल आणि मग टी-२० वर्ल्ड कप खेळण्याची रणनिती मी आखली होती, त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठीही हीच वेळ निवडण्यात आली, असं हार्दिकने डिसेंबरमध्ये सांगितलं होतं. 


५ ऑक्टोबरला लंडनमध्ये हार्दिकची शस्त्रक्रिया करण्यात आली. मागच्या ५ वर्षांपासून हार्दिक पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. भारताकडून ११ टेस्ट खेळलेला हार्दिक भारताकडून शेवटची टेस्ट मॅच जुलै २०१८ साली खेळला. आशिया कप २०१८ पासून हार्दिकचं पाठीचं दुखणं वाढलं. 


मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात टीम इंडियाचे फिजिओ योगेश परमार यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली. वर्ल्ड कपनंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात हार्दिकला विश्रांती देण्यात आली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी हार्दिकचं टीममध्ये पुनरागमन झालं. पण यानंतर बांगलादेशविरुद्धची टी-२० आणि टेस्ट सीरिज, वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० आणि वनडे सीरिज, ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज आणि न्यूझीलंड दौऱ्याला हार्दिकला मुकावं लागलं. 


हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याची भूमिका रवींद्र जडेजा चोख पार पाडत आहे. मागच्या ४ महिन्यात भारताने बहुतेक मॅच या घरच्या मैदानात खेळल्या. या मॅचमध्ये स्पिनर ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने उल्लेखनीय कामगिरी केली. न्यूझीलंड दौऱ्यातल्या टी-२० सीरिजमध्येही जडेजाचं प्रदर्शन चांगलं झालं. 


न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी अजूनही भारतीय टीमची घोषणा करण्यात आलेली नाही. फास्ट बॉलर इशांत शर्माची टेस्ट टीममध्ये निवड होण्याची शक्यता कमी आहे. रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाविरुद्धच्या मॅचवेळी इशांतच्या पायाला दुखापत झाली आहे.