Disrespecting Captain During Photo Session: भारत आणि बांगलादेशच्या (Ind vs Ban) महिला संघांदरम्यान बांगलादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका अनिर्णित राहिली. शेवटचा सामना बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघांना चषक वाटून देण्यात आला. मात्र या चषकाबरोबर फोटो काढताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) केलेल्या एका कृत्यामुळे तिच्याविरोधात बांगलादेशी चाहत्यांनी टीकेची झोड उटवली आहे. बांगलादेशच्या कर्णधाराचा आणि संघाचा हरमनप्रीतने अपमान केल्याचा दावा केला जात आहे. बांगलादेशच्या कर्णधारानेही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हरमनप्रीतवर टीकाही केली. हरमनप्रतीच्या या कृत्याची सध्या क्रिकेट जगतामध्ये चर्चा आहे. मात्र नेमकं असं काय घडलं की हरमनप्रीतने असं विधान केलं जाणून घेऊयात.


सामना बरोबरीत सुटला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिला संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर 3 एकदिवसीय सामने खेळला. यापैकी शेवटच्या सामन्यामध्ये बांगलादेशने प्रथम फलंदाजी करुन भारतासमोर 226 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र भारतीय महिलांना बांगलादेशच्या महिला संघाइतक्यात म्हणजेच 225 धावाच करता आल्या. पण या सामन्यामधील दोन्ही पंच हे बांगलादेशचेच होते. त्यांनी अनेक निर्णय चुकीच्या पद्धतीने दिल्याचं सामन्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीतबरोबरच उप-कर्णधार स्मृती मंधानानेही म्हटलं. दोघींनीही पंचांनी फारच सुमार कामगिरी केल्याचं सांगताना नाराजी व्यक्त केली. आपली हीच नाराजी हरमनप्रीतने चषक दोन्ही संघांच्या कर्णधारांकडे सोपवण्यात आल्यानंतर व्यक्त केली. 


ओरडून काय म्हणाली हरमनप्रीत?


बांगलादेश आणि भारतीय संघाने चषक वाटून घेतला. यावेळी चषकाबरोबर फोटो काढताना हरमनप्रीतने ओरडूनच, "पंचांनाही खेळाडूंबरोबर उभं करा. त्यांच्याशिवाय तुम्ही काहीच करु शकत नाही," असं बांगलादेशच्या महिला संघाकडे पाहत म्हटल्याचा दावा केला जात आहे. हा सामना अनिर्णित राहण्यामागे पंचांचे निर्णय कारणीभूत असल्याचं हरमनप्रीतला अधोरेखित करायचं होतं. मात्र हरमनप्रीतच्या या विधानानंतर बांगलादेशची कर्णधार निगर सुल्तानाने सर्व संघ सहकाऱ्यांना तिथून उठण्याचा इशारा केला. बांगलादेशचा संघ फारसे फोटो न काढताच निघून गेला.



बांगलादेशच्या कर्णधाराने केली टीका


बांगलादेशची कर्णधार निगर सुल्तानाने पत्रकार परिषदेमध्ये हरमनप्रीतच्या वागणुकीवर टीका केली. "हा पूर्णपणे त्यांचा प्रॉब्लेम आहे. मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. एक खेळाडू म्हणून तिची वर्तवणूक चांगली नव्हती. तिथे नेमकं काय झालं मला ठाऊक नाही. मात्र तिने (फोटोशूटदरम्यान पंचांवर) ओरडणं योग्य नव्हतं. क्रिकेटमधील नियमांचं पालन केलं पाहिजे. क्रिकेट हा सन्मानाचा खेळ आहे. त्यामुळेच आम्ही फोटोशूटच्या जागेवरुन लवकर बाजूला झालो," असं सुल्ताना म्हणाली.



स्मृतीही म्हणाली तिसऱ्या देशाचे पंच असावेत


सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताची उपकर्णधार स्मृति मंधानानेही उघडपणे पंचांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. "जेव्हा डीआरएस उपलब्ध नसतो तेव्हा पंचांचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे त्यांनी जपून निर्णय दिले पाहिजे. आमच्या पॅड्सवर चेंडू लागला की पंच सरळ बोट वर करुन आम्हाला बाद ठरवतात. मला विश्वास आहे की आयसीसी, बीसीसीआय आणि बीसीबी या मुद्द्याकडे लक्ष देईल. द्विपक्षीय मालिकेमध्ये जास्त न्यूट्रल पंच (तिसऱ्याच देशाचे) असायला हवेत. त्यामुळे आम्हाला या निर्णयांवर चर्चा करण्याऐवजी क्रिकेटवर जास्त लक्ष देता येईल," असंही स्मृती म्हणाली.