मुंबई : भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीमध्ये हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोहम्मद शमीशी लग्न करण्याआधी हसीन जहां मॉ़डेल होती. शमीसोबत वाद झाल्यानंतर ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल असा अंदाज होता. पण हे सगळे अंदाज फोल ठरवत तिनं काँग्रेसचा हात धरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षाच्या सुरुवातीला हसीन जहांनं मोहम्मद शमीवर मारपीट, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. यानंतर हसीन जहांनं शमीविरुद्ध केसही दाखल केली होती. मोहम्मद शमीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही हसीन जहांनं केला होता.


हसीन जहांनं शमीविरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आणि त्याच्याकडे महिन्याला १० लाख रुपयाची मागणी केली. पण कोलकात्याच्या न्यायालयानं हसीन जहांची ही मागणी फेटाळून लावली होती.


हसीन जहां बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल, अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. आर्थिक गरजा भागवण्यासाठी आणि मुलांसाठी काहीतरी मार्ग शोधावा लागेल, असं हसीन जहांनं डीएनए या वृत्तपत्राला सांगितलं होतं. दिग्दर्शक अमजद खान यांनी मला चित्रपटाची ऑफर दिली आहे आणि मी ती स्वीकारली आहे. तसंच कायदेशीर लढाई लढण्यासाठीही मला पैशांची गरज असल्याचं हसीन जहां म्हणाली होती.