नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या पत्नीनेच हसीन जहॉने त्याच्यावर अनैतिक संबंध ते मॅच फिक्सिंग असे गंभीर आरोप केले आहे. या वादाविषयी रोज नवी नवी माहिती समोर येत असताना अचानक रविवारी शमीच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला आहे. 


अपघातामुळे हसीनचे दुसरे रुप समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेहराडूनहून दिल्लीकडे जात असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात तो जखमी झाला. शमीच्या कारची आणि ट्रकची टक्कर झाल्याने हा अपघात घडला. या अपघातामुळे आतापर्यंत शमीवर आरोप करणाऱ्या त्याच्या पत्नीचे दुसरे रुप पाहायला मिळत आहे. ती शमीला भेटण्यासाठी आतुर झाली आहे. याबद्दल पत्रकारांशी बोलताना तिने सांगितले की, माझी लढाई शमी माझ्याशी जे वागला त्याविरोधात आहे. पण शारीरिकरीत्या त्याला घायाळ झालेले मी पाहू शकत नाही. तो कदाचित माझ्यावर पत्नीप्रमाणे प्रेम करत नसेल पण माझे अजूनही त्याच्यावर प्रेम आहे. तो माझा पती आहे. तो लवकर ठीक व्हावा यासाठी मी अल्लाहकडे नक्कीच प्रार्थना करेन.


पण तिच्या प्रयत्नांना यश नाही


हसीन आपल्या मुलीसह शमीला भेटू इच्छिते. मात्र तिच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. तिने सांगितले की, मी माझ्या पतीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र शमी तिच्या फोनला उत्तर देत नाहीये. त्याचे कुटुंबियही  शमीबद्दल कोणतीही माहिती देत नाहीयेत. त्यामुळे मी खूप हतबल झाले आहे.