टी-20 वर्ल्डकप जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला असला तरी हार्दिक पांड्यासमोरील (Hardik Pandya) आव्हानं अद्याप संपलेली नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टी-20 चा कर्णधार म्हणून निवड केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, क्रिकेटक्षेत्रात हीच चर्चा सुरु आहे. दरम्यान हार्दिक पांड्याची एकदिवसीय संघातील जागाही नक्की नसून, त्याबाबत कोणतीही हमी देण्यात आलेली नाही. हार्दिकने श्रीलंकेविरोधातील एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेणं निवड समितीमधील काहींना आवडलेलं नाही. तसंच त्याला संघ व्यवस्थापनाच्या पुढील योजनांबद्दल सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिकचं सतत आणि मोठ्या काळासाठी दुखापतग्रस्त असणं त्याला महागात पडलं असल्याची माहिती आहे. निवडकर्त्यांनी मंगळवारी हार्दिकशी संवाद साधला तेव्हा त्याला आम्ही कर्णधारापेक्षाही जास्त अपेक्षेने तुझ्याकडे पाहत आहोत असं सांगण्यात आलं. तसंच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अद्यापही तुझ्याकडून अपेक्षा असल्याचं सांगितलं. 


पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व 10 ओव्हर्स टाकण्यासाठी तो फिट असला पाहिजे. या वर्षाच्या सुरुवातीला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं होतं की, दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करायचं असल्यास सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे काही अपवाद आहेत. पण हार्दिक पांड्याला ही सोय देण्यात आलेली नाही. 


'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, गंभीरने कॉलदरम्यान स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिकला गोलंदाजीची फिटनेस सिद्ध करण्यासाठी बडोद्याकडून विजय हजारे ट्रॉफी खेळण्यास सांगितलं आहे. "हार्दिकने गंभीरला कॉलदरम्यान आठवण करुन दिली आहे की, एकदिवसीय सामन्यात तो संपूर्ण गोलंदाजीचा कोटा भरुन काढतो की नाही याकडे लक्ष असेल," अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे.


बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकातील एका नोटमध्ये म्हटलं आहे की ते ‘आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात खेळाडूंची उपलब्धता आणि सहभागावर लक्ष ठेवलं जाईल’. हार्दिकने 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर कोणतंही 50 षटकांचं क्रिकेट खेळलेलं नाही. वर्ल्डकपमध्ये दुखापत झाल्याने त्याला माघारी परतावं लागलं होतं. या दुखापतीनंतर चार महिने तो खेळापासून दूर होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो खेळू शकला नाही.


संपूर्ण आयपीएल हंगाम खेळत त्याने आपला फिटनेस सिद्ध केला होता. यानंतर T20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली, जिथे त्याने विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. पण निवडकर्ते आणि प्रशिक्षक गंभीरला अजूनही तो एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे की नाही यावर विश्वास नाही. हार्दिक पांड्याला जानेवारीत इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये आपला फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे. पण पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विचार करायचा असेल तर त्याची खरी कसोटी देशांतर्गत हंगामात असेल.