Ajinkya Rahane: रणजीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; आऊट असूनही पुन्हा फलंदाजीला उतरला रहाणे, पाहा कसा?
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेला या सामन्यात फिल्डींग करताना अडथळा आणल्याबद्दल आऊट करार देण्यात आला. मात्र तरीही तो त्याच इनिंगमध्ये पुन्हा फलंदाजीला आला.
Ajinkya Rahane: सध्या देशांतर्गत रणजी ट्रॉफी खेळवली जातेय. यामध्ये आसाम विरूद्ध मुंबई यांच्यात सामना सुरु असून या सामन्यात एक मोठी घटना घडलीये. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत ( Ajinkya Rahane ) ही घटना घडली असून त्याच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत अशी घटना कधी घडली नव्हती. या सामन्यात अजिंक्य रहाणेला आऊट देण्यात आलं होतं. मात्र तरीही तो त्याच इनिंगमध्ये पुन्हा फलंदाजीला आला. नेमकी ही घटना काय आहे ते पाहूया.
अजिंक्य रहाणेला का दिलं होतं आऊट?
अजिंक्य रहाणेला या सामन्यात फिल्डींग करताना अडथळा आणल्याबद्दल आऊट करार देण्यात आला. मात्र, काही वेळाने आसाम टीमने ही अपील मागे घेतल्यानंतर रहाणेने ( Ajinkya Rahane ) पुन्हा फलंदाजी केली. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे १८ रन्सवर खेळत होता. यावेळी त्याने बॉल मिड-ऑनच्या दिशेने टोलावला आणि सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी शिवम दुबेने रन घेण्यास नकार दिला. रहाणे ( Ajinkya Rahane ) बराच पुढे आला होता आणि आसामचा कर्णधार दानिश दासने बॉल उचलून कीपरच्या दिशेने फेकला. आणि नेमका हाच बॉल क्रिझवर परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहाणेला लागला.
रणजी ट्रॉफीच्या सामन्यात जबरदस्त ड्रामा
रहाणेला ( Ajinkya Rahane ) बॉल लागताच आसामच्या सर्व खेळाडूंनी फिल्डींगमध्ये अडथळा आणल्याबद्दल आऊटचं अपील केलं. यावेळी मैदानी अंपायरनेही ते मान्य केलं. या निर्णयानंतर लगेचच चहाचा ब्रेकही झाला. यानंतर आसामचे कोच मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि त्यांनी रहाणेविरुद्धचं ( Ajinkya Rahane ) अपील मागे घेत असल्याचं सांगितलं. आसामने चहापानाच्या वेळी अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि अंपायरलाही याबाबत माहिती दिली.
आऊट असूनही पुन्हा मैदानात उतरला रहाणे
नियमांनुसार, पुढील बॉल टाकण्यापूर्वी बाद करण्याचं अपील मागे घ्यावं लागतं आणि अंपायर जेव्हा ते स्विकारतील तेव्हाच फलंदाज परत येऊ शकतो. सुदैवाने रहाणे ( Ajinkya Rahane ) बाद झाल्यानंतर टी ब्रेक घेण्यात आला आणि त्याच दरम्यान आसाम टीमने आपला निर्णय बदलला. त्यामुळे तब्बल 20 मिनिटांनी रहाणे पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला.
रहाणे पुन्हा खेळण्यास नव्हता तयार
दिवसाचा खेळ संपल्यानंतर शार्दूल ठाकूरने याविषयी माहिती दिली. शार्दूलच्या म्हणण्यानुसार, "रहाणे ( Ajinkya Rahane ) मैदानात पुन्हा खेळायला जायला तयार नव्हता. त्याच्या मताने, अंपायरने एकदा आउट दिलं म्हणजे खेळाडू बाद असतो. मात्र, आम्ही त्याचं मन वळवलं. आम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पाहिला होता. ज्यावेळी रहाणे पुन्हा क्रिझमध्ये जाण्यासाठी वळला तेव्हा त्याला पळण्याची दिशा बदलणं शक्य नव्हतं. त्याने जाणुनबुजून फिल्डींगमध्ये बाधा आणली नाही."