मुंबई: मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा एक उत्तम फलंदाज म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. हिटमॅनच्या खेळावर कोणी फिदा नाही असं नाहीच. आज लाखो रुपये कमवणारा आणि आपल्या फलंदाजीनं प्रसिद्ध असलेल्या हिटमॅनकडे एकेकाळी शाळेची फी भरायचेही पैसे नव्हते. ऐकून आश्चर्य वाटेल पण इतक्या कठीण परिस्थितीवर मात करून आज त्याने यशाचं शिखर गाठलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील गोलंदाजांची डोकेदुखी ठरलेला भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आपल्या खेळातून क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. रोहित शर्माने अत्यंत हालाकीची परिस्थिती देखील तितक्याच जवळून अनुभवलेली आहे. एक काळ असा होता की गरीब कुटुंबात जन्मलेल्या रोहितकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. 


रोहित शर्मा मूळचा नागपूरचा. वडील एका खासगी कंपनीत केअर टेकर म्हणून काम करत होते. तर आई पौर्णिमा गृहिणी होती. रोहित जेव्हा दीड वर्षाच्या होता तेव्हा त्याचं कुटुंब नागपुरातून मुंबईमध्ये आलं. एका छोट्या खोलीत डोंबिवलीमध्ये ते राहात होते. रोहितच्या छोटा भावाचं नाव विशाल शर्मा आहे. 


दोन्ही मुलांचा खर्च एकट्य़ानं झेपणारा नव्हता त्यामुळे रोहितला त्याच्या आजी-आजोबांकडे किंवा नातेवाईकांकडे ठेवलं जात होतं. आठवड्यातून सुट्टी असेल तेव्हा आई-वडील भेटायला यायचे. रोहितला बालपणापासून क्रिकेटचं वेड होतं. 


जीथे शाळेची फी भरण्यासाठी अडचण होत होती तिथे रोहितचे क्रिकेटची हौस पूर्ण करणं वडिलांसाठी फार कठीण होतं. जवळजवळ अशक्यच होतं. अशा परिस्थितीतही रोहितनं आपलं स्वप्न सोडलं नाही. तो आपल्या काकांसोबत क्रिकेटवर चर्चा करायचा. त्याचं क्रिकेटप्रती असलेली निष्ठा, चिकाटी आणि करण्याची जिद्द पाहून काकांनी पैसे जमवून त्याला अॅकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून दिला. 


पुढे रोहित शर्माचा खेळ स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या क्रिकेट कोचने पाहिला आणि त्यांनी रोहितला मदत केली. कोच दिनेश लाड यांनी 4 वर्षांच्या स्कॉलरशिपची व्यवस्था देखील रोहितसाठी करून दिली. रोहितचा इथून सुरू झालेला प्रवास आजही यशस्वीरित्या सुरू आहे.