मुंबई : हॉकी आशिया कप-2022 स्पर्धेत भारत चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आज झालेल्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा 16-0 ने एकतर्फी पराभव केला. या पराभवासह भारताने बाद फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या या प्रवेशाने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे भारताच्या एका सामन्यातील कामगिरीने दोन प्रतिस्पर्धी चितपट झाले आहेत. 
  
आशिया चषकाच्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला आजचा विजय मिळवणे फार गरजेचे होते. त्यामुळे टीम इंडिया ताकदीने मैदानात उतरली होती. भारताने या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्याला दडपणात ठेवत गोलवर गोल करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचा स्कोर 3-0 होता, जो दुसऱ्या क्वार्टरमध्ये 6-0 असा झाला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये हा स्कोअर 10-0 वर गेला आणि शेवटी स्कोअर 16-0 वर गेला. यासह टीम इंडियाने इंडोनेशियावर 16-0 ने दमदार विजय नोंदवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने इंडोनेशियाचा 16-0 असा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. यासह टीम इंडिया सुपर-4 मध्ये पात्र ठरली आहे. विशेष म्हणजे भारताच्या या विजयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून विश्वचषक-2023 मधून बाहेर पडली आहे.


विश्वचषकासाठी पात्र 


या सामन्याचा 2023 मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकावरही परिणाम झाला आहे. कारण येथे मोठ्या फरकाने सामना जिंकणारा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतो. आता भारत जिंकल्याने विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. भारताच्या पात्रतेशिवाय जपान, कोरिया आणि मलेशिया हे देशही विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. तर वर्ल्डकपमधून पाकिस्तानचे कार्ड कापले गेले आहे. 


बाद फेरीसाठी पात्र असलेले संघ 
दुसरीकडे आशिया कपबद्दल बोलायचे झाले तर, जपान आणि भारत बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. आशिया चषक स्पर्धेत जपानचे ९ गुण आहेत, तर भारताचे ४ गुण आहेत. भारताने या आशिया चषकात आतापर्यंत 19 गोल केले आहेत, तर 6 गोल माफ केले आहेत. अशा परिस्थितीत त्याचा स्कोअर +13 आहे, ज्यामुळे त्याला पुढे जाण्यास मदत झाली आहे.