भुवनेश्वर : हॉकी वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. नेदरलँडनं क्वार्टर फायनलमध्ये भारताचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे यंदा भारतातच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्यामुळे भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची अपेक्षा होती. पण तीन वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या नेदरलँडनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. आता शनिवारी नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेमी फायनल होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं हॉकी वर्ल्ड कपची सेमी फायनल १९७५ साली खेळली होती. त्यावेळी भारतानं वर्ल्ड कपवरही आपलं नाव कोरलं होतं. यानंतर भारतानं ११ वर्ल्ड कप खेळले. यातले ३ वर्ल्ड कप तर भारतातच झाले, पण एकदाही भारताला सेमी फायनल गाठता आली नाही. वर्ल्ड कप इतिहासातली नेदरलँडचा भारतावरचा हा सातवा विजय आहे. भारतीय टीमला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडला एकदाही हरवता आलेलं नाही.


जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँडनं क्वार्टर फायनलमध्ये भारताला २-१नं हरवलं. भारतानं या मॅचच्या १२व्या मिनिटाला पहिला गोल करून आघाडी मिळवली. आकाशदीपनं पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला, पण ही आघाडी भारताला फार काळ टिकवता आली नाही. नेदरलँडच्या थिएरी ब्रिंकमेननं १४व्या मिनिटाला गोल करत नेदरलँडला बरोबरीत आणलं. यानंतर मिंक वान देर वीर्डन यानं दुसरा गोल करत नेदरलँडला आघाडी मिळवून दिली.


इंग्लंड-ऑस्ट्रेलियाही सेमी फायनलमध्ये


भुवनेश्वरमध्ये होत असलेल्या या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड हॉकी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचणारी चौथी टीम आहे. याआधी बेल्जियम, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहोचल्या होत्या. क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडनं अर्जेंटीनाचा आणि ऑस्ट्रेलियानं फ्रान्सचा पराभव केला होता. वर्ल्ड कपची सेमी फायनल १५ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी हॉकी वर्ल्ड कपची फायनल होईल.