मुंबई : भारतातल्या पहिल्या डे-नाईट टेस्ट मॅचला अखेर मुहूर्त मिळाला आहे. यावर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिजविरुद्धची एक टेस्ट डे-नाईट असेल अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. राजकोट किंवा हैदराबादमध्ये भारतातली पहिली डे-नाईट टेस्ट मॅच होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं परवानगी दिल्यावरच डे-नाईट टेस्ट मॅच होऊ शकते. समितीनं परवानगी दिली तर राजकोट किंवा हैदराबादमध्ये डे-नाईट टेस्ट मॅच होईल, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ जूनला भारत आणि अफगाणिस्तानमध्ये बंगळुरुमध्ये टेस्ट मॅच खेळवली जाईल. अफगाणिस्तानची ही पहिलीच टेस्ट मॅच असेल. या मॅचनंतर १८ मार्चपासून भारतात आशिया कप खेळवण्यात येणार आहे. पण पाकिस्तान टीमला भारतात खेळण्याची परवानगी मिळाली तरच आशिया कप भारतात होईल.


आशिया कपनंतर वेस्ट इंडिजची टीम भारतात येईल. या दौऱ्यामध्ये वेस्ट इंडिज ५ वनडे, ३ टी-२० आणि टेस्ट सीरिज खेळेल. मुंबई, पुणे, तिरुअनंतपुरम, इंदूर आणि गुवाहाटीमध्ये वनडे मॅच होतील तर कोलकाता, चेन्नई आणि कानपूर किंवा लखनऊमध्ये टी-20 मॅच होतील.


वेस्ट इंडिज दौरा संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल. ऑस्ट्रेलियानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा आहे. या दौऱ्यामध्ये भारत ५ वनडे आणि २ टी-20 मॅच खेळणारे.