कोहलीच्या निर्णयाचं मला आश्चर्य वाटलं नाही, सुनील गावस्कर यांचं मोठं विधान
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं. कॅप्टन्सीवरून पाय उतार होत कोहलीने चाहत्यांना मोठा धक्का दिला. विराट कोहलीने ट्विटरवर त्याचा हा निर्णय जाहीर केला. विराटच्या या निर्णयामुळे क्रीडा जगताला धक्का बसलाय मात्र माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना या गोष्टीचं अजिबात आश्चर्य वाटलं नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सुनील गावस्कर एका वेबसाईटशी बोलताना म्हणाले की, "मला याचं अजिबात आश्चर्य वाटत नाही. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतरच तो कर्णधारपद सोडेल असं मला वाटलं होतं. पण या निर्णयाचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही."
दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या दारूण पराभवानंतर विराट कोहलीला कर्णधारपदावरून दूर केलं जाऊ शकतं असं त्याला वाटलं असावं, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला, असंही गावस्कर यांनी म्हटलंय.
सुनील गावस्कर म्हणाले की, या मालिकेपूर्वी टीम इंडिया 3-0 ने जिंकू शकेल असा अंदाज वर्तवला जात होता, पण 1-2 ने पराभव पत्करावा लागला होता. अशा परिस्थितीत त्याला हा निर्णय घ्यावा लागला.
सुनील गावस्कर यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोहली टेस्ट टीमचा सर्वोत्तम कर्णधार आहे. सगळे रेकॉर्ड्स याची ग्वाही देतात.
अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय
दक्षिण आफ्रिकेकडून मालिका 1-2 ने मालिका गमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने ट्विट केलं की, "प्रत्येकाला एका टप्प्यावर येऊन थांबावं लागतं आणि भारतीय कसोटी कर्णधार म्हणून माझ्यासाठी हाच टप्पा आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले पण प्रयत्नांचा किंवा विश्वासाचा कधीच अभाव नाही राहिला."
विराट कोहलीने पुढे लिहिलंय, 'गेली सात वर्ष सातत्याने मेहनत, प्रयत्न आणि टीमला योग्य दिशेने नेण्याचा निर्धार केला आहे. हे काम मी प्रामाणिकपणे केलं आणि कोणतीही कसर सोडली नाही. मी माझ्या बाजूने 120 टक्के देण्यावर नेहमीच विश्वास ठेवला. माझ्या मनात अगदी स्पष्ट आहे आणि मी माझ्या संघाशी प्रामाणिक होतो."