विराट- सौरव गांगुली प्रकरण वाढणार की थांबणार?
विराटला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत आणि कोहलीच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं गेलं.
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. विराटला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत आणि कोहलीच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता गांगुलीने पत्रकारांना सांगितलं की, 'या गोष्टीला पुढे वाढवू नका, मला काही सांगायचं नाही.'
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीविरुद्ध काही कारवाई होणार का, असं विचारलं असता बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली म्हणाले की, "मला काही सांगायचं नाही, ही बीसीसीआयची बाब आहे आणि त्यांनाच सामोरे जावं लागेल."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी गांगुलीने सांगितलं की, विराटशी या संदर्भात बोलणं झालं आहे आणि त्याने त्याला टी-20चं कर्णधारपद न सोडण्याचं आवाहन केलं होतं, पण तो मान्य झाला नाही. यानंतर बीसीसीआय आणि सिलेक्टर्सने मिळून त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला.
गांगुली यांनी असंही म्हटलं होतं की, मी स्वतः विराटशी याबद्दल बोललो होतो आणि स्वतः मुख्य सिलेक्टर्सनेही त्याच्याशी चर्चा केली होती.
मात्र, विराटने बुधवारी पत्रकार परिषदेत या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आणि सांगितलं की, मला कधीही टी-20 चं कर्णधारपद सोडू नका असं सांगितलं नाही. कसोटी संघ निवडीच्या दीड तास अगोदर फोनवरून सर्व काही सांगण्यात आलं, ते योग्य नव्हतं.