Womens T20 WC: महिला विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान आमनसामने येणार
आयसीसीने महिला T20 विश्वचषक 2023 चे वेळापत्रक देखील जारी केले आहे. ही स्पर्धा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या महासंग्रामात फक्त 10 संघ सहभागी होणार आहेत.
ICC Womens T20 World Cup 2023: 16 ऑक्टोबर 2022 पासून ऑस्ट्रेलियात पुरुषांचा टी-20 विश्वचषक सुरू होणार आहे. दरम्यान आयसीसीने महिला T20 विश्वचषक 2023 चे वेळापत्रक देखील जारी केले आहे. ही स्पर्धा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या महासंग्रामात फक्त 10 संघ सहभागी होणार आहेत. 5-5 संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात असल्याने क्रीडाप्रेमींसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली. भारताला पहिला सामना 12 फेब्रुवारी 2023 रोजी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे.
वुमन्स वर्ल्डकप स्पर्धा 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. असं असलं तरी 27 फेब्रुवारी राखीव ठेवण्यात आला आहे. पाऊस पडल्यास हा राखीव दिवस वापरता येईल. याशिवाय 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठीही पुढील दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.
वर्ल्डकपच्या गट 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ आहेत. तर गट 2 मध्ये इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे.
भारतीय संघाचे विश्वचषकातील सामने
12 फेब्रुवारी भारत विरूद्ध पाकिस्तान
15 फेब्रुवारी भारत विरूद्ध वेस्ट इंडिज
18 फेब्रुवारी भारत विरूद्ध इंग्लंड
20 फेब्रुवारी भारत विरूद्ध आयर्लंड