T20 क्रिकेटमध्ये नवा नियम लागू, फिल्डिंग करणाऱ्या संघाला बसणार फटका
कसोटी क्रिकेटमध्ये हा नियम लागू आहे, आता टी-20 क्रिकेटमध्येही हा नियम लागू झाला आहे
T20 Cricket New Rule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (ICC) आंतरराष्ट्रीय T20 (T20I Cricket) सामन्यांमध्ये काही नवे नियम लागू केले आहेत. यानुसार आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी (Slow Over Rate) संघाला पेनाल्टी लावण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तसंच, सामन्यादरम्यान ड्रिंक्स ब्रेक घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.
हे नियम जानेवारी २०२२ पासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, जर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा ओव्हर रेटमध्ये निर्धारित वेळेपेक्षा मागे असेल, तर शिक्षा म्हणून उर्वरित षटकांमध्ये त्या संघाला एक क्षेत्ररक्षक ३० यार्डाच्या बाहेर ठेवता येणार नाहीत.
त्या क्षेत्ररक्षकाला 30 यार्डाच्या आत उभे राहावे लागेल. सध्या पॉवरप्लेनंतर (पहिली सहा षटके) पाच क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर राहू शकतात. मात्र नवीन नियमानुसार संघाची चूक असेल तर केवळ चार क्षेत्ररक्षक यार्डाच्या बाहेर राहू शकतील.
स्लो ओव्हर रेटसाठी फक्त दंड आकारला जात होता आणि दोषी संघातील खेळाडूंकडून पैसे कापले जात होते. यासोबतच संघाच्या कर्णधाराला डिमेरिट गुणही मिळत होते. नवीन नियम आल्यानंतरही जुनी शिक्षा कायम राहणार आहे.
हे नियम लागू झाल्यानंतर, पहिला आंतरराष्ट्रीय T20 सामना वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात 16 जानेवारी रोजी जमैकामधील सबिना पार्क येथे खेळवला जाईल. त्याच वेळी, महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना या नियमांनुसार 18 जानेवारी रोजी होणार आहे.
आयसीसीने काय सांगितलं
आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशीनुसार हे बदल लागू करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या 'द हंड्रेड स्पर्धेत' असा नियम पाहून आसीसीने त्यावर विचार केला. खेळाचा वेग सुधारण्यासाठी हे केलं गेलं पाहिजे, असं आयसीसीने म्हटलं आहे.
अडीच मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक
आयसीसीने टी-२० सामन्यांदरम्यान ड्रिंक्स ब्रेकलाही (Drinks Break) परवानगी दिली आहे. हा ब्रेक संघासाठी ऐच्छिक असेल. म्हणजेच कोणताही संघ आपल्याला हव्या त्या वेळेत हा ब्रेक घेऊ शकतो. हा ब्रेक अडीच मिनिटांचा असेल. या ड्रिंक्स ब्रेकची सुरुवात द्विपक्षीय मालिकेने होईल. यासाठी दोन्ही संघांना मालिका सुरू होण्यापूर्वी एकमेकांशी सहमती दर्शवावी लागेल.