ICC Media Right : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील चार वर्षांसाठी मीडिया हक्क जाहीर केले आहेत. आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, डिस्ने स्टारला आयसीसीच्या पुढील चार वर्षांच्या सर्व स्पर्धांच्या प्रसारणाचे अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत, डिस्ने स्टारकडे 2027 पर्यंत महिला आणि पुरुषांच्या जागतिक स्पर्धांचे टीव्ही आणि डिजिटल प्रसारण अधिकार असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने आयपीएलच्या धर्तीवर आपल्या जागतिक स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये एकाच टप्प्यात अनेक पक्षांद्वारे भारतातील प्रसारण हक्कांसाठी बोली लावणे समाविष्ट होते. यानंतर आज म्हणजेच शनिवारी डिस्ने स्टारला या लिलावाचा विजेता घोषित करण्यात आला. ICC ने शेअर केलेल्या माहितीनुसार, जून 2022 मध्ये लिलाव प्रक्रिया सुरू झाली, त्यानंतर निविदा, लिलाव आणि नंतर मूल्यांकनाची प्रक्रिया स्वीकारण्यात आली.


आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले, "पुढील चार वर्षांसाठी आयसीसी क्रिकेट सामन्यांचे प्रसारण करण्यासाठी डिस्ने स्टारसोबतची आमची भागीदारी सुरू ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. याआधी त्यांनी एक उत्कृष्ट निकाल दिला आहे आणि आमच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांना ही सपोर्ट देईल."



पुढील चार वर्षांत 777 आंतरराष्ट्रीय सामने


महत्त्वाचे म्हणजे, महिन्याच्या सुरुवातीला, ICC ने महिला आणि पुरुषांसाठी आगामी चार वर्षांचा भविष्य दौरा कार्यक्रम जाहीर केला. याअंतर्गत 2023 ते 2027 या कालावधीत 12 देशांच्या पुरुष संघांमध्ये चुरशीची क्रिकेट लढत होणार आहे. आयसीसीने जारी केलेल्या फ्युचर टूर प्रोग्रामनुसार (एफटीपी) पुढील टप्प्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये 777 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. यामध्ये 173 कसोटी, 281 एकदिवसीय आणि 323 टी-20 सामने होणार आहेत. सध्याच्या टप्प्यातील 694 सामन्यांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरच्या पुढच्या टप्प्यात द्विपक्षीय मालिकेव्यतिरिक्त, पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासह अनेक मोठ्या ICC स्पर्धा देखील खेळल्या जातील. यानंतर 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करतील. तर 2025 मध्ये पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. त्याच वेळी, भारत आणि श्रीलंका 2026 मध्ये टी-20 विश्वचषक एकत्र आयोजित करतील. 2027 मध्ये, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे विश्वचषक आयोजित करणार आहेत.