दुबई : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या वनडे सीरिजनंतर आयसीसीने नवी क्रमवारी घोषित केली आहे. आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत बॅट्समनच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो टॉप-१० मध्ये आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये केलेल्या शानदार कामगिरीचा फायदा बेयरस्टोला झाला आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉप-१०मध्ये विराट आणि रोहित हे दोनच भारतीय बॅट्समन आहेत. कोरोना व्हायरसमुळे टीम इंडियाने बऱ्याच महिन्यात एकही मॅच खेळलेली नाही, तरीही क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित त्यांच्या स्थानांवर कायम आहेत. विराट कोहलीचे ८७१ अंक आणि रोहित शर्माचे ८५५ अंक आहेत. 



२ वर्षानंतर टॉप-१० मध्ये आलेला जॉनी बेयरस्टोचे ७५४ अंक आहेत. तो १०व्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या वनडेमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि एलेक्स कॅरीने शतकं केली, याचा फायदाही दोघांच्या क्रमवारीमध्ये झाला. मॅक्सवेल २६व्या आणि कॅरी २८व्या क्रमांकावर गेला आहे. 


बॉलरच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट पहिल्या आणि जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. टॉप-१० मध्ये बुमराह हा एकमेव भारतीय बॉलर आहे.