दुबई : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंग्लंडसाठी आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये इंग्लंडने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर टीम इंडियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया २७ जूनला म्हणजेच वर्ल्ड कपदरम्यान पहिल्या क्रमांकावर गेली होती. पण टीम इंडियाला आपले पहिले स्थान महिनाभर देखील कायम ठेवण्यात अपयश आले.


वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून ३१ रनने पराभूत व्हावे लागले होते. यानंतर टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या गुणांमध्ये काही अंशी घट झाली.


आयसीसीची सुधारित क्रमवारी


टीम इंडिया आणि इंग्लंडच्या गुणांमध्ये केवळ एका पॉईंटचंच अंतर आहे. आयसीसीच्या सुधारित क्रमवारीत इंग्लंड १२३ पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडिया १२२ पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. यानंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या टीमचे पॉइंट्स ११३, ११२ आणि ११० असे आहेत.


पुढच्या महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये विजय मिळवून पुन्हा पहिल्या क्रमांकावर जायची टीम इंडियाला संधी आहे. 


बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर रोहित शर्माही दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण विराट आणि रोहित यांच्यामधलं अंतर कमी झालं आहे. विराट ८८६ पॉईंट्ससह पहिल्या आणि रोहित ८८१ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्ल्ड कपमध्ये रोहितने सर्वाधिक ६४८ रन केले. यामध्ये ५ शतकांचा समावेश होता. एका वर्ल्ड कपमध्ये एवढी शतकं मारण्याचा विक्रमही रोहितने केला. 


वनडे बॉलरच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह ८०९ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर ट्रेन बोल्टनेही त्याचा दुसरा क्रमांक कायम राखला आहे.