मुंबई : पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला आयसीसीनं चांगलाच दणका दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं न्यायालयीन वादामध्ये बीसीसीआयला नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश आयसीसीनं दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विदेशीय सीरिज होत नसल्यामुळे सामंजस्य कराराचा भंग होत आहे, त्यामुळे बीसीसीआयनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ७० मिलियन डॉलर द्यावेत, अशी याचिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं टाकली होती. पण ही याचिका आयसीसीनं फेटाळून लावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या याचिकेवेळी झालेल्या खर्च वसूल करण्यासाठी आयसीसीनं ६० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यायला सांगितली आहे. यामध्ये बीसीसीआयला यासाठी आलेला खर्च आणि या वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या पॅनलच्या व्यवस्थापकीय खर्च याचा समावेश आहे.


नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही याचिका फेटाळण्यात आली होती. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी या निर्णयावर टीका केली होती. हा निकाल हास्यास्पद आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप सेठींनी केला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं योग्य पद्धतीनं ही केस लढवली, पण आयसीसीमध्ये असलेल्या बीसीसीआयच्या लॉबीमुळे असा निर्णय आल्याची टीका सेठींनी केली होती.