ICC Ranking  : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला नव्या वर्षात जोरदार झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही झालं नव्हतं, अशी गोष्ट विराट कोहलीबाबत घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (ICC) जाहीर केलेल्या फलंदाजांच्या नव्या क्रमवारीत पाकिस्तान कर्णधार बाबर आझमने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं आहे. गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी सामना करणाऱ्या विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटी न खेळणं महागात पडलं आहे. 


बाबर आझमने विराटला मागे टाकत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत आठवं स्थान पटकावलं आहे. याआधीच बाबरने विराटला वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्येही मागे टाकलं आहे.



क्रमवारीत कोहलीला मोठा धक्का
कसोटी फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत विराटला दोन स्थानांचं नुकसान झालं असून त्याची नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यावेळी बाबरला एका स्थानाचा फायदा झाला असून त्याने आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही फॉरमॅटच्या फलंदाजी क्रमवारीत बाबरने विराटला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर पहिल्या तर विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20मध्ये बाबर दुसऱ्य तर विराट 11 व्या क्रमांकावर आहे.


विराट कोहलीचा खराब फॉर्म
विराटसाठी गेली काही वर्षे चांगली गेली नाहीत. नोव्हेंबर 2019 पासून कसोटी, एकदिवसीय किंवा T20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये विराट शतक झळकावू शकलेला नाही. डिसेंबर 2019 पासून आतापर्यंत विराटने 52 सामन्यांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये 39.20 च्या सरासरीने 2078 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 94 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 


बाबर आझम जबरदस्त फॉर्मात
याउलट याच काळात बाबर आझमीच कामगिरी दमदार झाली आहे. बाबरने डिसेंबर 2019 पासून 60 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 51.01 च्या सरासरीने 2857 धावा केल्या आहेत. यामध्ये सात शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 158 धावा आहे. 


आयसीसी क्रमवारीत भारताचे दोन फलंदाज अव्वल पाचमध्ये आहेत. केएल राहुलने 46 सामन्यांमध्ये 2181 धावा केल्या आहेत आणि रोहित शर्माने डिसेंबर 2019 पासून 38 सामन्यांमध्ये 2083 धावा केल्या आहेत. रोहितनंतर विराट आहे.


गेल्या वर्षभरातील आकडेवारी
गेल्या वर्षभरात बाबरने विराटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. बाबरने 1 जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 43 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 40.93 च्या सरासरीने 1760 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. तर विराटने 24 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37.07 च्या सरासरीने 964 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही.