१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम
१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम लागू होणार आहेत.
लंडन : १ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम लागू होणार आहेत. आयसीसीने सर्व देशांच्या बोर्डाच्या बैठकीत या बदलांना मान्यता दिली आहे. स्लो ओव्हर रेटसाठी आता कर्णधाराचं निलंबन होणार नाही. यापुढे स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधार आणि अन्य खेळाडूंना समान शिक्षा दिली जाईल. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपपासून याची सुरुवात होईल. आयसीसीने सबस्टिट्यूट खेळाडूलाही खेळण्याची परवानगी देण्याचा नियम केला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०१९ ते २०२१ या कालावधीमध्ये होणार आहे. याची सुरुवात १ ऑगस्टपासून म्हणजेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ऍशेस सीरिजपासून होणार आहे. ठराविक कालावधीमध्ये टीमने त्यांच्या ओव्हर पूर्ण केल्या नाहीत तर २ अंक कापले जातील. यासाठी सगळे खेळाडू समान दोषी असतील, तसंच सगळ्यांना समान शिक्षा होईल. याआधी स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधाराला मॅच फीच्या ५० टक्के आणि इतर खेळाडूंना १०-१० टक्के दंड व्हायचा. तसंच एका वर्षात तीनवेळा असं झालं तर कर्णधाराचं निलंबन व्हायचं.
आयसीसीने बैठकीमध्ये सबस्टिट्यूट खेळाडूच्या नियमामध्येही बदलाला मंजुरी दिली आहे. नव्या नियमानुसार जर खेळाडूला मैदानात दुखापत झाली तर त्याच्याऐवजी दुसरा खेळाडू टीममधून खेळू शकतो. हा खेळाडू बॉलिंग, बॅटिंग आणि विकेट कीपिंगही करु शकणार आहे. पण बदली खेळाडूचा सबस्टिट्यूट खेळाडू हा तसाच असला पाहिजे, म्हणजेच बॅट्समन दुखापतग्रस्त झाला तर त्याच्याऐवजी बॅट्समनच खेळेल किंवा बॉलर दुखापतग्रस्त झाला तर त्याच्याऐवजी बॉलरच खेळेल. यासाठी मॅच रेफ्रीची परवानगी आवश्यक आहे. या खेळाडूला 'कनकशन सबस्टिट्यूट' म्हणलं जाईल. टेस्ट, वनडे आणि टी-२० साठी हा नियम लागू असणार आहे.