दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्माने २ शतकं झळकावली. याचा फायदा त्याला क्रमवारीतही झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्कृष्ठ क्रमवारीवर पोहोचला आहे. रोहितने ३६ स्थानांची उडी मारत १७वा क्रमांक गाठला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाखापट्टमणमध्ये झालेल्या टेस्टमध्ये रोहितने १७६ आणि १२७ रनची खेळी केली होती. यामुळे रोहितला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं. या मॅचमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला होता.


रोहितबरोबरच मयंक अग्रवालही त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम क्रमवारीवर पोहोचला आहे. मयंकने पहिल्या इनिंगमध्ये २१५ रनची खेळी केली होती. त्यामुळे मयंक आता २५व्या क्रमांकावर आहे. रोहित आणि मयंक यांच्यात पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या विकेटसाठी ३१७ रनची पार्टनरशीप झाली होती.


भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पण जानेवारी २०१८नंतर विराट पहिल्यांदाच ९०० पॉईंट्सपेक्षा खाली आला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे.


बॉलरच्या क्रमवारीत अश्विन पुन्हा टॉप-१० मध्ये आला आहे. अश्विनने पहिल्या इनिंगमध्ये ७ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १ विकेट घेतली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये ५ विकेट घेणारा मोहम्मद शमी १६व्या क्रमांकावर गेला आहे. शमीच्या खात्यात ७१० पॉईंट्स आहेत. टीम क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.