India vs Pakistan World Cup : भारत आणि पाकिस्तान सामन्याची क्रिकेटप्रेमी आवर्जुन वाट पाहात असतात. भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2023) स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याची तिकिटं लाखो रुपयांत विकली गेली आहेत. इतकंच काय तर टेलिव्हिजन आणि ओटीटीवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्याचाही विक्रम होतो. आयसीसी स्पर्धांमध्येच हे दोन संघ आमने सामने येत असल्याने क्रिकेटचाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे आयसीसीच्या (ICC) स्पर्धांमध्ये विशेषत: विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघाला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत हे दोनही संघही एका गटात खेळताना दिसणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघाला वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आलं. पुढच्या वर्षी 13 जानेवारीला श्रीलंकेत अंडर-19 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं शेड्युल्ड आयसीसीने जारी केलं आहे. या शेड्युल्डमध्ये (World Cup Scheduled) भारत आणि पाकिस्तान संघाला वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आलं आहे. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारत गतविजेता आहे. गेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने यश ढुलच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धेला गवसणी घातली होती. आता सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 


असं आहे शेड्युल्ड
अंडर-19 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा ग्रुप - ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये भारतासह बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिकेचा संघ असणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 14 जानेवारीला बांग्लादेशविरुद्ध असणार आहे. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे 18 जानेवारीला भारत आणि अमेरिका आमने-सामने असणार आहे. 20 जानेवारीला भारत-आयर्लंड सामना होईल. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येकी चार संघांचे चार ग्रुप बनवण्यात आले आहेत. ग्रुप बी मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड संघांचा समावेश आहे. ग्रुप-सी मध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि नामिबिया तर ग्रुप-डीमध्य अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ संघांचा समावेश आहे. 


असा आहे स्पर्धेचा फॉर्मेट
प्रत्येक ग्रुपमधली तीन संघ पुढच्या फेरीत पोहोतील. त्याला सुपर-6 असं म्हटलं जाईल. म्हणजे बारा संघाचे प्रत्येकी सहाचे दोन ग्रुप बनवले जातील. सुपर-6 मध्ये प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल. दोन्ही ग्रुपमधील टॉपचे दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर फायनल खेळवली जाईल. अंडर-19 एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 4 फेब्रुवारीला खेळवला जाईल. श्रीलंकेतल्या कोलंबोमधल्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर हा सामना रंगेल. त्याआधी बारा जानेवारीपासून सराव सामने खेळवले जातील.