केपटाऊन टी-२० मॅच नंतर विराटकडे सुपूर्त करणार आयसीसी चॅम्पियनशिपची गदा
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचा आयसीसीतर्फे गौरव करण्यात येणार आहे.
केपटाऊन : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचा आयसीसीतर्फे गौरव करण्यात येणार आहे.
टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर एकची टीम बनल्याने आयसीसीतर्फे चॅम्पियनशिपची गदा विराट कोहलीच्या हातात सुपूर्त करणार आहे.
केपटाऊनध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी-२० सीरिजमधील शेवटची आणि तिसरी मॅच शनिवारी खेळली जात आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात या दौऱ्यात तीन टेस्ट, पाच वन-डे आणि तीन टी-२० मॅचेसच्या सीरिज खेळल्या जाणार आहेत. यापैकी टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, तरीही टीम इंडियाने टेस्ट टीम रँकिंगमध्ये आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.
यानंतर वन-डे सीरिजमध्ये भारताने ४-१ने दणदणीत विजय मिळवला. आता सुरु असलेली टी-२० सीरिज १-१ ने बरोबरीत झाली असून केपटाऊनमधील मॅच निर्णायक ठरणार आहे.
जानेवारी महिन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसरी आणि शेवटची टेस्ट जिंकली. या विजयासोबतच कोहली आणि कंपनीने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची गदा आपल्याकडेच कायम ठेवत १० लाख डॉलर्सचा पुरस्कार मिळवला होता. टीम रँकिंगटी कट-ऑफ तारीख तीन एप्रिल आहे.
भारतीय टीम १२४ गुणांसोबत दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली होती. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका १११ गुण घेवून १३ गुणांनी टीम इंडियाच्या मागे होती. त्यानंतर टीम इंडियाने आपले गुण वाढवत १२१ पर्यंत पोहोचले. तर, आफ्रिकेचे ११५ गुण आहेत.
टीम इंडियासाठी ही प्रतिष्ठित आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची गदा आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी इतके गुण भरपूर आहेत.