Kapil Dev On World Cup 2023 Final : वर्ल्ड कप 2023 (ICC Cricket World Cup 2023) चा अंतिम सामना नुकताच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं यजमानांचा दारुण पराभव केला. यावेळी सामन्यामध्ये अनेक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींची हजेरी पाहायला मिळाली. कला, राजकारण या आणि अशा सर्वच क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावलेली असतानाच सामन्यात एक चेहरा मात्र दिसलाच नाही, तो चेहरा होता देशाचा पहिल्यांदाच वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या कपिल देव यांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण जगाच्या नजरा लागून राहिलेल्या या वर्ल्ड कपविषयी देव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. आपल्याला अंतिम सामन्यासाठीचं आमंत्रणच मिळालं नव्हतं असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. एका माध्यम समुहानं क्रिकेटसंबंधी चर्चेसाठी आमंत्रित केलं असता अंतिम सामन्याच्या आमंत्रणाबाबत ते म्हणाले, 'तुम्ही मला बोलवलं, मी आलो. त्यांनी (वर्ल्ड कपच्या आयोजकांनी) नाही बोलवलं, मी नाही गेलो. मला वाटत होतं की, 1983 वर्ल्ड कपचा संपूर्ण संघ तिथं नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असावा. पण, इतकी सारी कामं सध्या सुरुयेत, इतक्या जबाबदाऱ्या आहेत की अनेकदा लोक विसरूनच जातात.'


हेसुद्धा पाहा : World Cup Final मध्ये पराभूत झालेल्या विराटला पाहून अशी होती अनुष्काची पहिली प्रतिक्रिया...


तिथं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीसुद्धा देव यांना अंतिम सामन्यासाठी आमंत्रित न केलं जाण्याविषयी ट्विट केलं. कपिल देव यांना अहमदाबाद येथील सामन्यासाठी आमंत्रित न करणं हे अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली होती. ज्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा बराच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. 



खेळाडूंना देण्यात येणार होतं आमंत्रण... मग पुढे काय झालं? 


तिथं कपिल देव यांनी आपल्याला बोलावणंच आलं नसल्याचं म्हटल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या. कारण, सामन्याआधी असंही म्हटलं गेलं होतं की, ज्या ज्या खेळाडूंनी वर्ल्ड कप जिंकला आहे त्या खेळाडूंना सामन्यासाठी बोलवण्यात येणार. यामध्ये महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांची नावं होती खरी, पण देव यांना आमंत्रणच नसल्यामुळं त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 


मुळात भारतीय क्रिकेट जगतामध्ये कपिल देव यांच्या नावाला बरंच वजन प्राप्त आहे. 1983 मध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला होता. खुद्द कपिल देव यानी या स्पर्धेमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारुपास येत जागतिक स्तरावरील दिग्गजांचं लक्ष वेधलं होतं. पण, याच खेळाडूला खरंच बीसीसीआय (BCCI) विसरलंय?