World Cup 2023: पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बासची भारतातून हकालपट्टी, `या` कारणाने घेतला निर्णय
ICC World Cup 2023 : पाकिस्तानची महिला क्रीडा अँकर जैनब अब्बास आयसीसी विश्वचषक स्पर्धेचं अँकरिंग करण्यासाठी भारतात आली होती. पण भारत सरकारने तिच्यावर कारवाई करत तिची भारतातून हकालपट्टी केली आहे.
ICC World Cup 2023 : भारतात 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेतील सहभागी झालेल्या सर्व दहा संघाचे पहिले सामने पार पडलेत. विश्वचषक स्पर्धेसाठी जगभरातील क्रिकेट चाहते आणि पत्रकार भारतात आलेत. पाकिस्तानची पत्रकार जैनब अब्बासही ( Zainab Abbas) भारतात आली होती. आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या (World Cup) कार्यक्रमात ती अँकरिंग करणार होती. पण भारतातून तिची हकालपट्टी करण्यात आली आहे. भारत सरकारने ही कारवाई केली आहे. जैनब सध्या दुबईत असल्याची माहिती आहे.
का केली कारवाई?
जैनब अब्बास ही पाकिस्तानची लोकप्रिय क्रीडा अँकर आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या कार्यक्रमात ती अँकरींग करणार होती. पण भारतीय वकील विनीत जिंदल यांनी जैनब अब्बासविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने जैनबची भारतातून हकालपट्टी करण्याचा आदेश दिला. जैनबने हिंदू देवी-देवतांचा अपमान केला होता. जैनबने एक ट्विट केलं होतं. यात तीने हिंदू देवी-देवतांविरोधात गरळ ओकली होती. जैनबने ही पोस्ट 'Zainablovesrk'या अकाऊंटवरुन शेअर केली होती. आता जैनाबने आपलं अकाऊंट बदललं असून 'ZAbbas Official' असं केलं आहे.
जैनब अब्बासविरोधात तक्रार
पाकिस्तानी पत्राकर जैनब अब्बासविरोधात दिल्लीच्या सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी तिच्याविरोधात आईपीसी कलम 153A, 295, 506 आणि 121 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वचषकाच्या प्रेजेन्टर लिस्टमधूनही तिला बाहेर करण्याची मागणी केली जात आहे. भारताविरोधात बोलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतात प्रवेश दिला जाणार नाही असं सरकारने सांगितलंय.
भारतीय क्रिकेटवरही केली होती टीका
जैनब अब्बासने याधी भारतीय क्रिकेटवर टीका केली होती. इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात एक वेगवान गोलंदाज जन्माला येत नाही, असं जैनबने म्हटलं होतं.
पाकिस्तानात जैनबची लोकप्रियता
पाकिस्तानात जैनब अब्बासची लोकप्रियता सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. 14 फेब्रुवारी 1988 ला पाकिस्तानमधल्या लाहोरमध्ये जैनबचा जन्म झाला. जैनबचे वडील नासिर अब्बास (Nasir Abbas) हे पाकिस्तानमधल्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळले आहेत. तर तिची आई अंदलीब अब्बास (Andleeb Abbas) खासदार आहे. जैनबने इंग्लंडमधल्या वारविक युनिव्हर्सिटीतून (University of Warwick) मार्केटिंग अँड स्ट्रॅटेजेत एमबीए केलं आहे.
पाकिस्तान जैनबने अनेक टीव्ही चॅनल्स, वेबसाईट आणि युट्यूबसाठी स्पोर्ट्स अँकरिंग केलं आहे. 2019 मध्ये जैनबला आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पहिली पाकिस्तानी महिला स्पोर्ट्स अँकरचा मान मिळाला.