ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने (Shubman Gill) तुफानी सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा-शुभमन गिलने केवळ आठ षटकात पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली. ही जोडी मैदानावर जमली असतानाच रोहित शर्मा 47 धावांवर बाद झाला. पण एकाबाजूला शुभमन गिलने खंबीरपणे किल्ला लढवला. शुभमन गिलने 65 धावात 79 धावा केल्या. गिल शतक ठोकणार असं वाटत असतानाच अचानक त्याला मैदान सोडावं लागलं. संपूर्ण मैदान स्तब्ध झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलला 23 व्या षटकात मैदान सोडावं लागलं. गिल रिटायर्ड हर्ट (Retired Hurt) झाला त्यावेळी तो 79 धावांवर खेळत होता. रोहितनंतर गिलने विराट कोहलीबरोबरही (Virat Kohli) अर्धशतकी भागिदारी केली होती. पण फलंदाजी करत असताना अचानक त्याच्या पायाच्या मांसपेशी दुखावल्या गेल्या आणि तो मैदानावरच बसला. वैद्यकीय स्टाफ तात्काळ मैदानावर आला आणि प्राथमिक उपचार केले. पण यानंतरही त्याची दुखापत कायम होती. त्याच्या चेहऱ्यावर दुखापतीचं दु:ख स्पष्ट जाणवत होतं. अखेरच स्टाफच्या मदतीने तो पॅव्हेलिअनमध्ये परतला. मैदान सोडताना मैदानातील सर्व प्रेक्षकांनी उभं राहात त्याला मानवंदना दिली. 


भारतीय इनिंगच्या 23 व्या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर धाव घेताना गिलच्या पायाला दुखापत झाली. त्याच्या पायाच्या मांसपेशी ओढल्या गेल्याने त्याल धाव घेणं जमलं नाही. त्यानंतर पुढे खेळणं शक्य नसल्याने त्याने रिटायर्ड हर्ट होण्याची निर्णय घेतला. 


शतकाची संधी हुकली
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची टॉप ऑर्डर जबरदस्त फॉर्मात आहे. पहिल्या पाच फलंदाजांपैकी चार फलंदाजांनी शतक ठोकलं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने शतक केलंय. यात विराट कोहलीच्या दोन शतकं आहेत. केवळ शुभमन गिलचं शतक बाकी होतं. आज ते शतकही पूर्ण होईल असं वाटत असतानाच गिल मैदानातून बाहेर गेला. आपल्या 79 धावांच्या खेळीत गिलने 8 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याचा स्ट्राईकरेटही 120 इतका तगडा होता. विशेष गोष्ट म्हणजे गिलचे आई-वडिलही हा सामना पाहण्यासाठी वानखेडे मैदानावर हजर होते. 


विश्वचषकात गिल फॉर्मात
शुभमन गिलने या विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. आठ सामन्यात त्याने 349 धावा केल्या आहेत. त्याचा रनरेट 49.85 इतका आहे. विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीलाच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झालीहोती. त्यामुळे तो सुरुवातीच्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्याऐवजी ईशान किशनला संधी देण्यात आली होती. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात शुभमन गिल परतला. रोहित शर्माबरोबर त्याने टीम इंडियाल प्रत्येक सामन्यात दमदार सुरुवात करुन दिली आहे. या वर्षात गिलने 5 शतकांसह सर्वाधिक धावा केल्या आहेत. या जोरावर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही तो अव्वल क्रमांकावर आहे.