ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याला आता दोन दिवसांच्या कालावधी उलटून गेलाय. पण अद्यापही या सामन्याच्या चर्चा सुरु आहेत. विशेषत: भारताविरुद्धचा हा पराभव पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचं आव्हान पार करत पाकिस्तानने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांना बाबारसेनेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण भारताने पाकिस्तानला दोनशे धावांचा टप्पाही पार करु दिला नाही. टीम इंडियाचा 7 विकेटने विजय झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी चाहते संतापले
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघ चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. इतकंच काय तर पाकिस्तानी खेळाडूंच्या कुटुंबियांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय. विशेषत: पाकस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) कुटुंबियांना ट्रोलर्सकडून त्रास दिला जात आहे. त्यामुळे बाबर आझमच्या वडीलांनी मोठं पाऊल उचलल आहे बाबर आझमचे वडील आझम सिद्दीकी ( Azam Siddique) यांनी आपलं सोशल मीडिया अकाऊंट बंद करुन टाकलं आहे.  आझम सिद्दीकी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रोलर्सने वादग्रस्त कमेंट केल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. तर बाबर आझमनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं कमेंट सेक्शन बंद करुन टाकलं आहे. 


भारताविरुद्ध आठवा पराभव
विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताने पाकिस्तानचा आठव्यांदा पराभव केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात याआधी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आतापर्यंत सातवेळा आमने सामने आले आहेत. 1992 विश्वचषकात या दोनही संघात पहिल्यांदाच सामना रंगला. त्यानंतर 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानदरम्यान सामना खेळवला गेला. या प्रत्येक सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारलीय आहे.


छोट्या फॅनने टिव्ही फोडला
पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. एक कुटुंब एकत्र बसून भारत-पाकिस्तान सामना पाहाताना या व्हिडिओत दिसत होते. पाकिस्तानची फलंदाजी सुरु असताना बाबर आझम आऊट होतो आणि या छोट्या फॅनचा संयम सुटतो. हातातल्या जड वस्तूने तो चक्क टिव्हीच फोडून टाकतो. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. 


पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. यातल्या दोन सामन्यात पाकने विजय मिळवलाय तर एका सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आता पाकिस्तानचा चौथा सामना पाचवेळा विश्वचषक विजेत्या बलाढ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाची या स्पर्धेतील सुरुवातही चांगली झालेली नाही. तीन सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाला दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.