India vs Sri Lanka ICC ODI World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) विजयाचा षटकार लगावला आहे. आता सलग सातवा विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाच्या खात्यात सहा विजयांसह बारा पॉईंट्स जमा असून टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे (India vs Sri Lanka). मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium, Mumbai) हा सामना होणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत सेमीफायनलचं तिकिट पक्कं करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी असेल प्लेईंग इलेव्हन
टीम इंडियाचा कर्णधार रोहत शर्मा या विश्वचषकात जबरदस्त फॉर्मात आहे. विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात रोहित शर्माने 398 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावलं होतं. दुसरीकडे सलामीवीर शुभमन गिलाला (Shubman Gill) अद्याप त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंतच्या सहा सामन्यात त्याला केवळ एक अर्धशतक करत आलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलच डावाची सुरुवात करतील. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचं स्थान पक्कं आहे. विराट कोहलीसुद्धा जबरदस्त फॉर्मात आहे. विराटने सहा सामन्यात 354 धावा केल्या आहेत. 


या खेळाडूला पुन्हा संधी
या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला वारंवार संधी दिली जात आहे. पण गेल्या सहा सामन्यात त्याला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. यावरुन बरीच टीका होतेय. श्रेयस अय्यरच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात यावी अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे. पण फलंदाजीच्या क्रमवारीत बदल  करण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरलाच संधी मिळू शकते. श्रेयस अय्यरने नेटमध्ये आखूड टप्प्याच्या चेंडूवर जोरदार सराव केला. गेल्या काही सामन्यात तो आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद होतोय. त्याची ही कमकुवत बाजू विरोधी संघाच्या गोलंदाजांनी हेरली आहे. 


विकेटकीपरची जबाबादारी आणि पाचव्या क्रमांकावर केएल राहुलचं स्थानही अबाधित आहे. केएल राहुल मॅच फिनिशर ठरतोय. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरतोय, पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे. हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादवला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला स्थान मिळे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्याने 49 धावांची आक्रमक खेळी केली होती. 


गोलंदाजीतही बदल नाही
टीम इंडियाच्या गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमीचा आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे वेगवान त्रिकूट जबरदस्त फॉर्मात आहे. शमीने अवघ्या दोन सामन्यात नऊ विकेट घेतल्यात. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाच तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. फिरकीची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादववर असेल. 


श्रीलकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव