ICC World Cup: सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष लागून राहिलेल्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता फक्त दीड महिना शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे वर्ल्डकप असल्याने सर्व मैदानं प्रेक्षकांनी तुडुंब भरलेली असतील. पुढच्या आठवड्यात तिकीट विक्रीला सुरुवात होणार असून, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र यादरम्यान, आयसीसी वर्ल्डकपच्या वेळापत्रकात आणखी एक बदल करण्याची विनंती करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आधीच उशिरा जाहीर झालेल्या वेळापत्रकात एकदा बदल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) बीसीसीयला (Board of Control for Cricket in India) पत्र लिहिलं असून सलग होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये थोडं अंतर ठेवण्याची विनंती केली आहे. उप्पल येथील राजीव गांधी स्टेडियमवर 9 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड-नेदरलँड सामना होणार असून दुसऱ्या दिवशी पाकिस्तान-श्रीलंका सामना होणार आहे. 


यापूर्वी 12 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता, परंतु भारताबरोबरचा सामना एक दिवस पुढे ढकल्यानंतर पाकिस्तानला पुरेसा वेळ देण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. हैदराबाद 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान-नेदरलँड्स सामन्याचं आयोजन करणार आहे. दरम्यान सलग सामने होणार असल्याने पोलिसांनीही सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. खासकरुन पाकिस्तानचा सामना असल्याने पोलिसांना सुरेक्षेची चिंता सतावत आहे. 


भारत 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. वर्ल्डकपसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच वेळपत्रक जाहीर करण्यात आलं होतं. याआधी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये (2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड; 2019 मध्ये युनायटेड किंगडममध्ये) वर्षभरापूर्वीच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. 


सध्याच्या वर्ल्डकपच्या वेळापत्रकात आधीच मोठे बदल करण्यात आले असून जवळपास 9 सामन्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सर्वांचं लक्ष लागलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यातही बदल करण्यात आला असून, एक दिवस आधी खेळला जाणार आहे. संपूर्ण गुजरातमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार होता. पण नवरात्रीमुळे हा सामना एक दिवस आधी होणार आहे. 


तसेच, कोलकातामध्ये 12 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान-इंग्लंड सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यादिवशी काली पूजा असल्याने हा सामना 11 नोव्हेंबरला होणार आहे. 


या दोन सामन्यांमध्ये बदल केल्यानंतर वेळापत्रक सुटसुटीत करण्यासाठी काही इतर सामन्यातही बदल झाले आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला हलवला गेला, तेव्हा त्याच दिवशी तीन सामने होते. त्यामुळे त्यातही बदल करावे लागले. वेळापत्रकात बदल करताना संघांना सामन्यांदरम्यान प्रवास, विश्रांती आणि प्रशिक्षण यांचीही काळजी घेणं आवश्यक असतं.