रांची टेस्ट जिंकल्यास भारताचा सर्वाधिक विजयाचा विक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचला शनिवारपासून रांचीमध्ये सुरुवात होत आहे.
रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचला शनिवारपासून रांचीमध्ये सुरुवात होत आहे. याआधीच्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, त्यामुळे भारताने सीरिज खिशात टाकली आहे. आता तिसऱ्या टेस्ट मॅचमध्येही भारताचा विजय झाला तर भारत दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश करेल. तसंच २०१९ साली सर्वाधिक टेस्ट जिंकण्याचा विक्रमही भारताच्या नावावर होईल.
२०१९मध्ये भारताने ५ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याच्याबाबतीत टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने यावर्षी सर्वाधिक ९ टेस्ट मॅच खेळल्या. यानंतर ऑस्ट्रेलिया(८), दक्षिण आफ्रिका(६), श्रीलंका(६) आणि मग भारताचा नंबर लागतो. वेस्ट इंडिज आणि भारताने ५ टेस्ट मॅच खेळल्या आहेत.
भारताने ऑस्ट्रेलियासोबतच इतर ४ टीमपेक्षा कमी मॅच खेळल्या आहेत. पण विजयाच्या बाबतीत भारत मागे नाही. भारताने ५ मॅचपैकी ४ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानेही ४ मॅच जिंकल्या आहेत. टीम इंडिया रांचीमध्ये जेव्हा खेळायला उतरेल तेव्हा त्यांच्याकडे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी आहे. २०१९ या वर्षात ५ टेस्ट जिंकणारी भारत पहिलीच टीम बनेल.
भारत आणि अफगाणिस्तान यावर्षात एकही मॅच हरलेला नाही. भारताने यावर्षी ५ मॅच खेळल्या यातल्या ४ टेस्टमध्ये विजय तर १ टेस्ट ड्रॉ झाली. अफगाणिस्तानने यावर्षी २ मॅच खेळल्या त्यातल्या दोन्ही मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. भारत आणि अफगाणिस्तान यांचं या वर्षी विजयाचं रेकॉर्ड १०० टक्के आहे.
२०१९ साली एकूण २६ टेस्ट मॅच खेळण्यात आल्या, यातल्या २ टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या आहेत. या दोन्ही ड्रॉ टेस्ट ऑस्ट्रेलियाच्याच नावावर आहेत. जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्धचा सामना ड्रॉ झाला होता, तर ऍशेस सीरिजमध्ये इंग्लंडविरुद्धची मॅचही ड्रॉ झाली होती.