बुमराहचा ऑस्ट्रेलियाला जोरदार पंच! ट्रेव्हिस हेड, स्मिथ सारख्या 5 दिग्गजांना धाडलं माघारी
Jasprit Bumrah : रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 5 विकेट्स घेऊन दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले.
IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शनिवार 14 डिसेंबर पासून गाबा येथे सुरु झालेल्या तिसऱ्या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे खराब झाला. परिणामी केवळ 13 ओव्हर्सचा खेळ होऊ शकला, पण या दरम्यान भारताला एकही विकेट मिळवता आली नव्हती. मात्र रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 5 विकेट्स घेऊन दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले.
शनिवारी गाबा टेस्टला सुरुवात झाल्यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. रविवारी दुसऱ्या दिवशी सामना सुरु झाला तेव्हा जसप्रीत बुमराहने 17 व्या ओव्हरला उस्मान ख्वाजा आणि 19 व्या ओव्हरला नॅथन मॅकस्विनीची विकेट घेतली. त्यानंतर बरेच ओव्हर टीम इंडियाला विकेटसाठी प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीने मैदानात दमदार फलंदाजी करून प्रत्येकी शतकीय कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने 101 धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 12 चौकार लगावले. परंतु अखेर 82.6 ओव्हरला तो बुमराहच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या मिचेल मार्शची बुमराहने 87 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला विकेट घेतली. तर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 152 धावा केलेल्या ट्रेव्हिस हेडला देखील माघारी धाडण्यास जसप्रीत बुमराहला यश मिळाले. जसप्रीत बुमराह याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील पर्थ येथील पहिल्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये बुमराह हा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यात एकूण 17 विकेट्स घेतल्या असून यात त्याच्या तुलनेत मिचेल स्टार्कने 11 तर पॅट कमिन्स 10 विकेट्सवर आहे.
हेही वाचा : तिसरी टेस्ट सुरु असतानाच 3 खेळाडूंना टीम इंडियातून काढलं बाहेर, BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय
भारताची प्लेईंग 11 :
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.