`आपण कदाचित रोहित शर्माला...`, गावसकरांचं भाकीत! रवी शास्त्रीही म्हणाले, `टॉसदरम्यान...`
Rohit Sharma Opts Out of Sydney Test: सुनील गावसकरांबरोबरच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या निर्णयावर सूचक विधान केलं आहे.
Rohit Sharma Opts Out of Sydney Test: वारंवार सुमार कामगिरी केल्यामुळे सध्या टीकेचा धनी ठरत असलेल्या रोहित शर्माने बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने सध्या सुरु असलेल्या या मालिकेतील 3 सामन्यात 5 वेळा फलंदाजी करत केवळ 31 धावा केल्या आहेत. उपकर्णधार जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीप्रमाणेच शेवटच्या कसोटीमध्येही संघाची धुरा हाती घेतली आहे.
सुनील गावसकर म्हणाले, रोहितचा शेवटचा कसोटी सामना खेळून झालाय
मात्र रोहितला वगळण्यात आल्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनी 26 डिसेंबर रोजी खेळवण्यात आलेला बॉक्सिंग डे कसोटी सामना हा त्याचा शेवटचा कसोटी सामना होता असं म्हटलं आहे. गावसकर यांनी सिडनीमध्ये आजपासून सुरु झालेल्या कसोटीच्या सुरुवातीलाच, "या सामन्यात खेळत असलेला संघ पाहिल्यास त्याचा अर्थ असा काढता येईल की भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी पात्र ठरला नाही तर मेलबर्न कसोटी ही रोहित शर्माची शेवटची कसोटी ठरली," असं म्हटलं आहे. "पुढच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फेरी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने होईल. अशावेळेस निवड समितीकडून अशा खेळाडूंना प्राधान्य दिलं जाईल जे 2027 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळू शकतील. भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहचणार की नाही ही पुढची गोष्ट आहे. मात्र फायनल खेळणाऱ्या खेळाडूंनाच सुरुवातीपासून संधी द्यायचा निवड समितीचा विचार असणार," असं गावसकर म्हणाले. "आपण कदाचित रोहित शर्माला शेवटची कसोटी खेळताना पाहून झालं आहे," असं सुनील गावसकर म्हणाले.
रवी शास्त्रींचा शाब्दिक स्ट्रेट ड्राइव्ह
दुसरीकडे रवी शास्त्री यांनी, "टॉसदरम्यान मी विचारण्याच्या आधीच जसप्रीत बुमराहने कर्णधाराने संघातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तसेच शुभमन गिल आल्याने टीम अधिक कणखर होईल असंही म्हटलं," अशी माहिती दिली. "जेव्हा तुम्हाला धावा करता येत नाही आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही मैदानावर नसता तेव्हा असं होतं. हा कर्णधाराचा (रोहित शर्माचा) फार मोठा निर्णय आहे. तो या सामन्यातून बाहेर राहण्यासाठी तयार झाला हे अत्यंत महत्त्वाचं आहे," असं रवी शास्त्री म्हणाले.
नक्की वाचा >> Ind v Aus: 'इथे स्वार्थीपणे...', बुमराहने सांगितलं कॅप्टन रोहितलाच सिडनी टेस्टमधून वगळण्याचं खरं कारण
"हा निर्णय कठीण आहे पण..."
भारत बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेमध्ये 1-2 ने पिछाडीवर आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळायची असेल तर सिडनी कसोटी जिंकावीच लागणार आहे. या कसोटीत पराभव झाला तर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या स्पर्धेतून बाहेर पडेल. भारताची पुढील मालिका थेट जून महिन्यात आहे. शास्त्रींनी, "घरगुती स्पर्धा सुरु झाल्या तर तो (रोहित) तिथे खेळण्याचा विचार करु शकतो. मात्र तो या कसोटीनंतरच (निवृत्तीची) घोषणा करेल असं मला वाटतं," असंही आवर्जून सांगितलं. "तो (रोहित) आता तरुण राहिलेला नाही. भारताकडे तरुण खेळाडूंची कमतरता नाही. अनेक प्रतिभावान खेळाडू संघाच्या उंबरठ्यावर आपल्याला संधी मिळेल याची वाट पाहत आहेत. हा निर्णय कठीण आहे पण प्रत्येकाला तो कधी ना कधी घ्यावाच लागतो," असं सूचक विधान शास्त्री यांनी रोहितच्या निवृत्तीबद्दल बोलताना केलं.
मांजरेकरांनी केलं कौतुक
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी रोहित शर्माच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. "अगदी रोहित शर्मा स्टाइल निर्णय आहे. योग्य वेळी संघासाठी योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे. मात्र याबद्दल एवढं गूढ का ठेवलं हे न कळण्यासारखं आहे. नाणेफेक होतानाही यावर चर्चा झाली नाही," असं मांजरेकर म्हणालेत.