`220 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजांनी..`; सव्वा दोनशे धावा करुनही पराभव झाल्याने सूर्यकुमार वैतागला
Suryakumar Yadav On Australia beat India in 3rd T20I: गोलंदाजी करताना मॅक्सवेलने शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतुराज फलंदाजी करत असताना तब्बल 30 धावा दिल्या. मात्र याची कसर मॅक्सवेलने भरुन काढली.
Suryakumar Yadav After Australia beat India in 3rd T20I: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स राखून तिसरा टी-20 सामना जिंकला. या विजयासहीत ऑस्ट्रेलियाने मालिकेतील चुरस 2-1 च्या फरकाने अधिक वाढली आहे. गुवाहाटीमधील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियासमोर 223 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि अॅरॉन हार्डीने चांगली सुरुवात करुन दिली. ऑस्ट्रेलियाच्या या आघाडीच्या जोडीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 40 धावा केल्या. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाला 134 धावांवर पाचवा धक्का भारतीय गोलंदाजांनी दिला. भारतीय संघ सामना जिंकणार असं वाटत असतानाच ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेण्यात भारताला अपयश आळं. अखेर ग्लेन मॅक्सवेलच ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. या सामन्यानंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव गोलंदाजांवर वैतागल्याचं दिसून आलं.
ते सामना जिंकण्याच्या शर्यतीत होते
सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने गोलंदाजांना लक्ष्याचा बचाव करण्यात अपयश आल्याचं म्हटलं आहे. संघाची चूक नेमकी कुठे झाली याबद्दलही सूर्यकुमारने भाष्य केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर सूर्यकुमारने "आमचा प्लॅन होता की ग्लेन मॅक्सवेलला लवकरात लवकर पव्हेलियनमध्ये पाठवावं. मैदानामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दवं असल्याने 220 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजांनी विकेट्स घ्यायला हव्या होत्या असा विचार होता. ऑस्ट्रेलियाच्या हाती विकेट्स असल्याने ते सामना जिंकण्याच्या शर्यतीत होते," असं म्हटलं. पुढे बोलताना सूर्यकुमार यादवने, "मी ड्रिंक्स ब्रेकदरम्यान सहकाऱ्यांना, आपण मॅक्सवेलला लवकरात लवकर बाद करायचा प्रयत्न करुयात. मात्र असं झालं नाही. त्याने अगदी वेड्यासारखी फटकेबाजी केली. अक्षर एक अनुभवी गोलंदाज आहे. दवं पडल्यानंतर अनुभवी गोलंदाजाकडे विकेट्स काढण्याची संधी असते. अगदी तो फिरकी गोलंदाज असला तरी. मात्र विकेट्स मिळाल्या नाहीत. पण मला माझ्या खेळाडूंवर गर्व आहे," असं सांगितलं.
16 बॉलमध्ये 96 धावा
मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी करताना 48 बॉलमध्ये नाबाद 104 धावांची खेळी केली. शेवटच्या बॉलवर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. गोलंदाजी करताना मॅक्सवेलने शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतुराज फलंदाजी करत असताना तब्बल 30 धावा दिल्या. मात्र याची कसर मॅक्सवेलने भरुन काढली. मॅक्सवेलच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. मॅक्सवेलने 8 चौकार आणि 8 षटकार लगावले. म्हणजेच मॅक्सवेलने 96 धावा चौकार आणि षटकाराच्या मदतीने केल्या.