आर अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजय
पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे.
IND VS BAN 1st test 3rd Match : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे. रविवारी टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण घातले. यात आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स पटकावल्या. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे.
आर अश्विनच्या शतकाने गाजला पहिला दिवस :
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजमधील पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात आला. पहिल्या दिवसापासून या टेस्ट सामन्याच्या टीम इंडियाची मजबूत पकड होती. पहिल्या दिवशी बांगलादेशने टॉस जिंकल्यावर टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान मिळाले. यावेळी बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूदने रोहित, शुभमन नंतर विराट या सारख्या स्टार फलंदाजांना स्वस्तात बाद केले. टीम इंडिया संकटात असताना रवींद्र जडेजा, आर अश्विन, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने चांगली फलंदाजी केली. आर अश्विनने तर 113 धावा करून शतक ठोकले तर रवींद्र जडेजाने सुद्धा 86 धावांची खेळी केली. यामुळे टीम इंडिया पहिल्या दिवशी 376 धावांची आघाडी घेऊ शकली.
बूम बूम बुमराहचा चौकार :
पहिल्या टेस्ट सामन्याचा दुसरा दिवस जसप्रीत बुमराहने गाजवला. बांगलादेशला फलंदाजी करून पहिल्या इनिंग टीम इंडियाची 376 धावांची आघाडी मोडीत काढायची होती. मात्र यावेळी टीम इंडियाच्या बॉलिंग अटॅक समोर ते टिकू शकले नाहीत. यावेळी जसप्रीत बुमराहने बांगलादेशच्या 4, तर सिराज, आकाश दीप आणि जडेजाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे बांगलादेशला पहिल्या इनिंगमध्ये केवळ 149 धावा करता आल्या.
हेही वाचा : ऋषभ पंतने लगावली कमबॅक सेंच्युरी, पण मैदानात उतरण्यापूर्वी बॅट सोबत नेमकं काय केलं? Video आला समोर
ऋषभ पंतच कमबॅक शतक :
चेन्नईतील टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरले. मात्र ऋषभ पंत आणि शुभमन गिल या दोघांनी शतक ठोकून बांग्लादेशच्या गोलंदाजांना घाम फोडला. ऋषभ पंतने 109 तर शुभमन गिलने 119 धावा केल्या. ज्यामुळे टीम इंडियाने विजयासाठी बांगलादेशल तब्बल 515 धावांचे आव्हान दिले. तिसऱ्या दिवसाअंती बांगलादेशने 158 धावा केल्या आणि 4 विकेट्स गमावल्या होत्या.
अश्विन - जडेजाने पुन्हा फोडला घाम :
पहिल्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने अवघ्या काही तासातच बांग्लादेशच्या सर्व विकेट्स घेऊन पहिला सामना खिशात घातला. आर अश्विनने बांगलादेशच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ६ विकेट्स घेतल्या. तर जडेजाने 3 आणि बुमराहने एक विकेट घेतली. यासह टीम इंडियाने 280 धावांनी मोठा विजय मिळवला.