नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. पहिल्या ओव्हरमध्ये २ फोर मारल्यानंतर रोहित शर्मा आऊट झाला. पण तरीही त्याने विराट कोहली आणि धोनीला मागे टाकलं आहे. रोहितने या मॅचमध्ये ५ बॉल खेळून ९ रन केले. याचसोबत रोहित टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. रोहितने ९९ मॅचमध्ये २,४५२ रन केले आहेत. रोहितने हा विक्रम करताना विराट कोहलीला मागे टाकलं आहे. विराटने ७२ मॅचमध्ये २,४५० रन केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माची ही ९९वी आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच आहे. भारताकडून सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर झाला आहे. याआधी ९८ मॅच खेळणाऱ्या धोनीच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. सर्वाधिक मॅच खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैना ७८ मॅचसह तिसऱ्या, विराट कोहली ७२ मॅचसह चौथ्या आणि युवराज सिंग ५८ मॅचसह पाचव्या क्रमांकावर आहे.


सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. शोएब मलिक पाकिस्तानकडून १११ टी-२० मॅच खेळला आहे. या यादीत रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदीने प्रत्येकी ९९ टी-२० मॅच खेळल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये रोहित शर्मा खेळल्यावर तो शाहिद आफ्रिदीलाही मागे टाकेल.