मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना नुकताच पार पडला. भारतीय संघाकडून झालेल्या काही छोट्या चुकांमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. यावेळी भारतीय संघाला पहिली फलंदाजी मिळाली. त्यावेळी संघाने 6 विकेट्स गमावून 156 धावांची खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या फलंदाजी दरम्यान भारतीय संघ मात्र कमी पडला. याचं कारण म्हणजे फिल्डिंग आणि रन आऊट करण्याच्या संधी देखील भारतीय संघाने सोडल्याचं सांगितलं जात आहे. सामन्यादरम्यान विराट कोहली शार्दुल ठाकूरवर खूप जास्त संतापल्याचं पाहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


शार्दुल ठाकूरकडून झाली ही चूक
इंग्लंडच्या डावाच्या 12 व्या षटकात जॉनी बेअरस्टोने युझवेंद्र चहलचा चेंडू लेग साइडला खेचला आणि रन काढण्यासाठी पुढे गेला. शार्दुल ठाकूरने तेथून चेंडू उचलला आणि गोलंदाजी करणाऱ्याच्या दिशेने फेकला. गोलंदाजाकडे तो चेंडू जाण्याऐवजी त्याचा थ्रो कव्हरवर उभे असलेल्या विराट कोहलीकडे गेला.


 



शार्दुल ठाकूरची खराब फील्डिंग पाहून विराट कोहली संतापला. कोहलीने शार्दुलकडे पाहिले आणि रागाने त्याच्यावर ओरडल्याचं दिसत आहे.


शार्दुल ठाकूरच्या चुकीमुळे इंग्लंडला 36 धावा आरामात काढता आल्या. त्याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. युजवेंद्र चहलची कामगिरी देखील काही खास राहिली नाही. 4 ओव्हरमध्ये केवळ एक गडी बाद करण्यात त्याला यश आलं आणि त्या बदल्यात त्यानं इंग्लंड संघाला 41 धावा काढायला दिल्याचा फटका देखील भारतीय संघाला बसला. 


युजवेंद्र चहलला टी 20 तिसऱ्या डावासाठी दिलेल्या संधीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे लोक जसप्रीत बुमराहला मिस करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.