T20 World Cup Semi-Final: कोणाला आठवतंय गेल्यावेळी काय झालेलं? सेमीफायनलपूर्वी इंग्लंडची भारताला वॉर्निंग
T20WC 2024 2nd Semi-Final IND vs ENG: 27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या गयाना स्टेडियमवर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसरी सेमीफायनल खेळवली जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच इंग्लंडने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टीम इंडियाला चेतावणी दिलीये.
T20WC 2024 2nd Semi-Final IND vs ENG: टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करतेय. यावेळी टीम इंडियाने या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. 27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या गयाना स्टेडियमवर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसरी सेमीफायनल खेळवली जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच इंग्लंडने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टीम इंडियाला चेतावणी दिलीये.
इंग्लंडकडून टीम इंडियाला चेतावणी
इंग्लंड क्रिकेटने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये T20 वर्ल्ड कप 2022 दरम्यान जॉस बटलरचा फोटो आहे. त्या फोटोवर लिहिले आहे - "ब्रेकिंग: 2024 टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनल फेरीमध्ये इंग्लंडचा सामना भारताशी होणार आहे" यासोबतच इंग्लंड क्रिकेटने या पोस्टच्या कॅप्शनवर लिहिले आहे की, "गेल्या वेळी काय झाले हे कोणाला माहित आहे का?"
टी-20 वर्ल्डकप 2022 चा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सर्व क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या टीमने भारताला 10 विकेट्सने पराभव केला होता. शिवाय फायनलमध्ये जाऊन इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं.
T20 वर्ल्डकप 2022 च्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी झाला होता. या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी खेळली होती. भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 168 रन्स केले होते. यावेळी इंग्लंडच्या डावात भारतीय गोलंदाजांना अजिबात चांगली कामगिरी करता आली नाही. अखेरीस इंग्लंडने 16 ओव्हर्समध्ये 170 रन्स करून लक्ष्य गाठलं होतं. याशिवाय 24 चेंडू शिल्लक असताना 10 विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यात ॲलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 रन्स केले होते तर जोस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 रन्स केले.
वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध इंग्लंड हेड टू हेट
टी-20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत भारत विरूद्ध इंग्लंड या दोन्ही टीम चार वेळा आमने सामने आल्या आहेत. यामध्ये दोन्ही भारत आणि इंग्लंड या दोघांनीही 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे 27 तारखेला होणाऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात दोन्ही संघांवर चाहत्यांचं लक्ष असणार आहे.