IND vs ENG : टीम इंडिया फायनलमध्ये जाणार; रोहितला फक्त करावं लागणार `हे` काम
इंग्लंडच्या संघाचा आज पराभव झाला तर भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला पाहायला मिळणार आहे
IND vs ENG T20 World Cup : टी-20 विश्वचषक स्पर्धेत 2022 (T20 Word Cup) आज भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) अशी अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीच्या या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पाकिस्तानशी (pakistan) भिडणार आहे. त्यामुळे इंग्लंडला पराभूत करुन भारत पाकिस्तान (ind vs pak) असा शेवटचा सामना व्हावा यासाठी दोन्ही देशांचे चाहते प्रार्थना करत आहेत. मात्र फक्त चाहतेच नाही तर खेळाडूंचीही पाकिस्तानसोबत भारताची लढत व्हावी अशी भावना आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याआधी भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने मोठी भविष्यवाणी केली आहे.
भारताची माजी महिला क्रिकेटपटू मिताली राजने (Mithali Raj) स्टार स्पोर्ट्सच्या 'क्रिकेट लाइव्ह' शोमध्ये बोलताना याबाबत भाष्य केले आहे. 'नक्कीच (भारत-पाकिस्तान फायनल) होऊ शकते. पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असून आता भारताला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे,' असे मिताली राजने अंतिम सामन्याबाबत विचारले असता म्हटले आहे.
रोहित शर्माला (Rohit Sharma) फक्त एकच काम करावं लागेल
"उद्या त्यांना (भारताला) इंग्लंडला हरवायचे असेल तर त्यांना प्रत्येक बाजूने सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवावी लागेल. या मैदानावर भारताने चांगली कामगिरी केली आहे. मैदानावर आजच्या विकेटसारखी स्थिती असेल तर ती भारतासाठी नक्कीच फायद्याची ठरेल. तसेच कर्णधार रोहित शर्माला त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतावे लागेल," असे मिताली राज म्हणाली.
IND vs ENG : सूर्यकुमार नाही तर 'या' घातक फलंदाजापासून इंग्लंडला धोका; केल्यात सर्वाधिक धावा
रोहित शर्माचा दिवस येईल तेव्हा भारत जिंकेल - हरभजन सिंग
भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला (harbhajan singh) आशा आहे की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फॉर्ममध्ये परतेल. "मला वाटते की रोहित शर्मासाठी आपली क्षमता दाखवण्याची ही संधी आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने जे केले ते आपण पाहिले. मोठ्या सामन्यातील ते मोठे खेळाडू ठरले. रोहित हा देखील मोठा खेळाडू आहे आणि त्याने धावा कराव्यात अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. खेळपट्टीवर खेळणे कितीही कठीण असले तरीही तो जेव्हा धावा करतो तेव्हा तो वेगळ्या खेळपट्टीवर फलंदाजी करत असल्याचे दिसते. त्याने फॉर्म परत मिळवावा अशी आपली सर्वांची इच्छा आहे. जेव्हा त्याचा दिवस येईल तेव्हा भारत जिंकेल," असे हरभजन सिंगने म्हटले आहे.
IND vs ENG : भारत - इंग्लंड सेमीफायनलमध्ये कोण मारणार बाजी? आकडेवारी पाहून निकाल स्पष्टंय
दरम्यान, भारताने इंग्लंडला हरवल्यास वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी असलेला भारत आणि पाकिस्तान 15 वर्षांनंतर आमनेसामने येतील. 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्या टी- 20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता, जो भारताने जिंकला होता. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.