Yashasvi Jaiswal Century : राजकोटमध्ये सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात (IND vs ENG 3rd Test) टीम इंडियाचा युवा धुरंधर फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने वादळी शतक ठोकलंय. पहिल्या डावात इंग्लंडचा खुर्दा उडवल्यानंतर टीम इंडियाच्या सलामीवीराने इंग्लंडच्या बेझबॉलचा माज उतरवला. इंग्लंडच्या समोर जयस्वालने बेझबॉलची हवा काढली आणि करियरमधील तिसरं कसोटी शतक झळकावलं. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल (Shubhman Gill) आणि यशस्वी जयस्वाल यांनी ज्याप्रकारे खेळी केली, ते पाहून टीम इंडियाचं भविष्य उज्वल असल्याचं मत क्रिडातज्ज्ञांनी नोंदवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. यामध्ये यशस्वी जयस्वालला चांगली कामगिरी करता आली नव्हती. तो केवळ 10 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर सलामीवीर पार्टनर रोहित शर्माने गाडा हाकला अन् 131 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात यशस्वीने पहिल्यासारखी चूक केली नाही. त्याने सावध सुरूवात केली अन् मैदानात नजरा जमवल्या. एकदा का बॉलचा अंदाज आला की मग यशस्वीने बॉलर्सला धुवून काढलं. 


यशस्वी जयस्वालने सावध सुरूवात केली. 80 बॉलमध्ये यशस्वीने 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर मात्र त्याने आक्रमक फलंदाजी करत बॉलर्सवर प्रेशर आणलं. 49 बॉलमध्ये यशस्वीने 75 धावांनी खेळी केली अन् शतक ठोकलं. शुभमन गिलने यशस्वीसह दुसऱ्या विकटेसाठी नाबाद शतकी भागिदारी केली. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे यशस्वीला मैदान सोडावं लागलं. यशस्वी मैदानाबाहेर गेल्यावर शुभमन गिलने मोर्चा सांभाळला अन् धावांचा आकडा कायम ठेवला. 



दरम्यान, यशस्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करताना दिसतोय. यशस्वीने दुसऱ्या कसोटी सामन्यात 209 धावांची खेळी करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. त्यानंतर आता त्याची कसोटीमधील जागा जवळजवळ पक्की असल्याचं समजलं जातंय.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


इंग्लंड : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.