विराट-सर्फराज आले धावून, बंगळुरु कसोटीत टीम इंडियाचं जशास तसं उत्तर...किवी गोलंदाजांना घाम फोडला
पहिल्या टेस्ट सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. यात फलंदाजी करताना भारताने दिवसाअंती 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्या.
IND VS NZ 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन समान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. बुधवारपासून बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली असून आज या सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. यात फलंदाजी करताना भारताने दिवसाअंती 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्या. दिवसाअंती न्यूझीलंडने 125 धावांच्या आघाडीवर आहे.
रोहित शर्माचं अर्धशतक :
तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार खेळी करून 402 धावा केल्या आणि 356 धावांची आघाडी घेतली. पहिल्या इनिंगमध्ये 46 वर ऑल आउट झालेली टीम इंडिया धावांचा डोंगर कसा पार करेल अशी शंका सर्वांना होती मात्र कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार अर्धशतक ठोकले. न्यूझीलंडने उभी केलेली धावांची मोठी आघाडी मोडण्यासाठी टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा हे सलामी फलंदाज मैदानात आले. यावेळी दोघांनी मैदानात टिकून राहत 72 धावांची पार्टनरशिप केली. यात रोहित शर्माने 52 धावा करून अर्धशतक ठोकले तर यशस्वीने देखील 35 धावा केल्या. मात्र 22 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर रोहित शर्माची अनपेक्षित विकेट पडली. रोहित शर्माची विकेट गेली तेव्हा भारताची धावसंख्या 95 धावांवर 2 अशी होती.
हेही वाचा : Video : रोहित शर्माचं बॅड लक! विचारही केला नसेल अशी विकेट पडली, रडवेल्या चेहऱ्यानं मैदानाबाहेर पडला
विराट आणि सरफराजची दमदार खेळी :
रोहित शर्मा आउट झाल्यावर सरफराज खान मैदानात आला त्याने विराट कोहलीच्या साथीने मैदानात जम बसवला. विराट आणि सरफराज दोघांनी विकेट वाचवून मैदानात दमदार खेळी केली. विराट कोहलीने यात 8 चौकार आणि १ षटकार ठोकत 102 बॉलमध्ये 70 धावा केल्या. दरम्यान विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करून दिग्गजांच्या यादीत नाव मिळवलं. तर युवा खेळाडू सरफराज खानने देखील 7 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर नाबाद 70 धावा केल्या. 49 व्या ओव्हरच्या 6 व्या बॉलवर विराटची विकेट पडली. ग्लेन फिलिप्सने त्याला आउट केले. तिसऱ्या दिवसाच्या अंती टीम इंडियाने 356 पैकी 231 धावाची आघाडी मोडली आता न्यूझीलंड फक्त 125 धावांनी आघाडीवर आहे.