न्यूझीलंडमध्ये भारताची धमाकेदार सुरुवात! परदेशातला सगळ्यात मोठा विजय
भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंड दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे.
ऑकलंड : भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंड दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला आहे. विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये २०३/५ एवढा स्कोअर केला. भारतीय टीमने हे आव्हान एक ओव्हर बाकी असतानाच पूर्ण केलं. याचबरोबर भारताने ५ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये परदेशातला भारताचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. परदेशामध्ये भारताने टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच २०० रनच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे. भारताने याआधी श्रीलंकेविरुद्ध २०७ रन, वेस्ट इंडिजविरुद्ध २०८ रन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२ रनचं आव्हान पूर्ण केलं होतं, पण हे सगळे विजय भारतात मिळालेले होते.
पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंनी अर्धशतकं केली. ओपनर कॉलिन मुन्रोने ४२ बॉलमध्ये सर्वाधिक ५९ रन केले. रॉस टेलरने २७ बॉलमध्ये ५४ रन आणि कर्णधार केन विलियमसनने २६ बॉलमध्ये ५१ रन केले. मार्टिन गप्टीलने १९ बॉलमध्ये ३० रनची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि विराट कोहली हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. श्रेयस अय्यरने २९ बॉलमध्ये नाबाद ५८ रन केले. तर केएल राहुलने २७ बॉलमध्ये ५६ रन आणि विराट कोहलीने ३२ बॉलमध्ये ४५ रनची खेळी केली. मनिष पांडे १२ बॉलमध्ये १४ रनवर नाबाद राहिला. शिवम दुबेन ९ बॉलमध्ये १३ रन करुन आऊट झाला. श्रेयस अय्यरला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
भारत आणि न्यूझीलंडची दुसरी टी-२० मॅच रविवार २६ जानेवारीला खेळवली जाणार आहे. ही मॅचदेखील ऑकलंडच्या इडन पार्क याच मैदानात होणार आहे.