हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय झाला. सुपर ओव्हरच्या शेवटच्या २ बॉलवर भारताला विजयासाठी १० रनची गरज होती. या दोन्ही बॉलवर सिक्स मारून रोहित शर्माने भारताला जिंकवून दिलं. त्याआधी मोहम्मद शमीने २० व्या ओव्हरमध्ये भेदक बॉलिंग करुन भारताला मॅच टाय करुन दिली. याचसोबत भारताने ५ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये ३-०ने विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडमध्ये भारताने पहिल्यांदाच सीरिज जिंकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्धच्या या रोमांचक विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली. 'आम्ही मॅच हरलो आहोत, असं एका वेळी वाटत होतं. विलियमसनने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि टीमचं नेतृत्व केलं, ते पाहता न्यूझीलंडचा विजय व्हायला पाहिजे, असं मी प्रशिक्षकांना म्हणालो,' असं विराटने सांगितलं.


'मॅचच्या नाजूक क्षणांमध्ये आम्हाला विकेट मिळाल्या. पुन्हा एकदा मोहम्मद शमीने त्याचा अनुभव दाखवून दिला आणि ऑफ स्टम्पबाहेर दोन बॉल ठेवले. शेवटचा बॉल स्टम्पवर टाकला तरच संधी आहे, अन्यथा एक रन काढल्यानंतर न्यूझीलंड मॅच जिंकेल, असं आमचं बोलणं झालं. शमीने स्टम्पवर बॉल टाकून विकेट घेतली आणि मॅच पलटली', असं वक्तव्य विराटने केलं.


'आज आमचा दिवस होता. अशा उत्कृष्ट सामन्याचा भाग होणं शानदार होतं. शमीने त्या २ बॉलवर एकही रन दिली नाही, तेव्हा विकेट मिळाली तर मॅच सुपर ओव्हरमध्ये जाईल, असं मला वाटलं. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवरच दबाव असेल, कारण त्यांच्या हातातून मॅच निसटली होती. केन विलियमसनने बुमराहसारख्या सर्वोत्कृष्ट बॉलरवर आक्रमण केलं. ही मॅच सी-सॉ सारखी फिरत होती,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.


'आम्ही ही सीरिज ५-०ने जिंकण्याचा प्रयत्न करु. नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारखे खेळाडू अजून बाहेर आहेत. त्यांना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. आमचं लक्ष्य उरलेल्या दोन्ही मॅच जिंकणं आहे,' असं विराट म्हणाला.